कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आता पालिका प्रशासन, पोलीस आक्रमक झाले आहेत. रेल्वे स्थानक भागातून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचे सत्ताधीश साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत, यामुळे टीकेचे लक्ष्य झाले आहेत. फेरीवाल्यांचा कैवार घेणाऱ्या राजकीय नेत्यांचे वरिष्ठांनी चांगलेच कान उपटले आहेत. सगळा विचार करून शहरवासीयांनी पालिका प्रशासन, पोलिसांना सहकार्य करून किमान रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ, सुंदर, मोकळा राहील यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लोकांनी फेरीवाल्यांकडून खरेदीच केली नाही तर रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांचा टिकाव लागणार नाही. लोकांनीच बहिष्कार टाकून ही अनिष्ट प्रथा बंद करणे आवश्यक आहे..

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात फक्त फेरीवाल्यांचा विषय गाजत आहे. पालिका अधिकारी, कर्मचारीच फेरीवाल्यांची पाठराखण करीत आहेत. नगरसेवक पडद्यामागून फेरीवाल्यांचे आश्रयदाते आहेत, अशी चहूबाजूंनी टीका झाल्याने पालिका आयुक्तांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. फेरीवाल्यांचे नेतेपद सांभाळून ‘तुम्ही तुमचे पाहता, पण पक्षाला रस्त्यावर आणून तुम्ही पक्षाला नाहक बदनाम करता, तेव्हा झाले तेवढे पुरे. आता फेरीवाल्यांची नेतेगिरी थांबवा,’ अशी कानउघाडणी एका राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यामुळे उघडपणे फेरीवाल्यांची पाठराखण करण्याची हिम्मत सध्या तरी कोणता नगरसेवक, स्थानिक फेरीवाल्यांचा राजकीय नेता करणार नाही. पालिकेकडून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईत फेरीवाल्यांचा टिकाव लागणे आणि त्यांच्या मालाची विक्री होणे अवघड आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना नियमित व्याजाने पैसे देणाऱ्या व्याजी सावकारांनी फेरीवाल्यांना व्याजाने पैसे देण्याचे कमी केले आहे. तुमचा मालच संपणार नाही तर तुम्ही मला पैसे कुठून देणार, असा या व्याजी सावकारांचा फेरीवाल्यांना प्रश्न आहे. अशा रीतीने ज्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फेरीवाले रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करीत होते. ते फेरीवाले सध्या अनाथ झाले आहेत. चोरून लपून काही दांडगाईखोर फेरीवाल्यांनी व्यवसाय केला तरी दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत जी रगड रक्कम विक्री व्यवहारातून फेरीवाल्यांना मिळायची ती येणे बंद झाले आहे. उघडपणे रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करणे शक्य नाही आणि व्यवसाय करताना सापडला तर सामान जप्त किंवा नासधूस होण्याची सर्वाधिक भीती. त्यामुळे रेल्वे स्थानक भागात टिकाव लागणार नाही म्हणून काही सरळमार्गी फेरीवाले निळ्या प्लॅस्टिक पिशवीत सामान भरून आता शहरातील चाळी, गल्लीबोळात जाऊन व्यवसाय करू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

प्रत्येकाला उपजीविकेसाठी आपला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. तो त्यांचा हक्क आहे. पण रस्ते, पदपथ अडवून बिनधास्तपणे रेल्वे स्थानक भागात, लोकांच्या नियमित ये-जा करण्याचा मार्ग अडवून व्यवसाय करण्याचा परवाना फेरीवाल्यांना कुणी दिला हा प्रश्न होता. मात्र तो आता सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक भागातून नियमित ये-जा करणाऱ्या, सकाळ, संध्याकाळ खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या रहिवासी, पादचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. पालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

कल्याण डोंबिवलीतील बहुतेक रहिवासी हे नोकरी, व्यवसायानिमित्त लोकलने मुंबई दिशेकडे जातात. सकाळच्या वेळेत रिक्षेतून उतरल्यानंतर फेरीवाल्यांच्या गराडय़ातून हा स्त्री-पुरुष चाकरमानी रेल्वे स्थानकापर्यंत जाताना चडफडत असतो. फेरीवाल्यांनी

अडवलेले रस्ते, पदपथ, स्कायवॉक हे त्याचे मुख्य दुखणे असते. पण, हाच चाकरमानी संध्याकाळच्या वेळेत कामावरून घरी परतण्यास निघतो; त्या वेळी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तो, ती पहिले कापडी पिशवी कार्यालयीन बॅगेतून बाहेर काढतो. सकाळच्या वेळेत फेरीवाल्यांकडे पाहून कपाळाला आठय़ा पाडणारा हाच चाकरमानी संध्याकाळच्या वेळेत याच फेरीवाल्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी सज्ज झालेला असतो. इतरत्र कोठे महागडे खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्यांच्याकडून घासाघीस करून चांगल्यात चांगले आणि स्वस्तात स्वस्त पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. फेरीवाल्यांकडील बहुतेक माल हा दिखाऊ आणि चायना मेडचा. आपण खरेदी केलेली वस्तू कोणत्या कंपनी, देशातील यापेक्षा किती आकर्षक आणि स्वस्तात मिळाली याचे कौतुक खरेदीदार चाकरमान्याला असते. या वस्तुंमध्ये भ्रमणध्वनींची वेष्टने, इअरफोन, कमरपट्टे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कलाकुसरीच्या पिशव्या, दिखाऊ चपला अशा अनेक अल्पकाळ टिकणाऱ्या वस्तूंचा समावेश असतो. या वस्तू खरेदी केल्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यात त्या लुळ्यापांगळ्या पडतात. चालता चालता पायाखाली खड्डा, खडा नसताना त्या टिकाऊ चपलेचा पट्टाच तुटतो. दुचाकीला किक मारतानाच कमरपट्टय़ाचा हूक गळून पडतो. भ्रमणध्वनीचे वेष्टन पावसाचा एक थेंब त्यावर पडताच लोंबायला लागते. इअरफोनचा आवाज खरखर करायला लागतो. ही झाली वानगीदाखल उदाहरणे. या वस्तू एकदा खराब झाल्या, की त्या कचऱ्यात म्हणजे भंगारात फेकल्या जातात. हा घरातील कचरा पुन्हा कचरा कुंडीतील कचरा, भंगार विक्रेत्यांच्या माध्यमातून शहरातील कचऱ्यात नवीन भर घालत असतो. अगोदरच पालिकेला आहे तो ६५० टन दररोजचा कचरा कसा विघटित करायचा याचा प्रश्न पडला आहे. त्यात या नवीन कचऱ्याची भर दिवसेंदिवस पडत आहे. रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्लीबोळातील कोपरे या फेरीवाल्यांनी टाकलेल्या टाकाऊ सामानाने भरले आहेत. शहर फेरीवाल्यांनी गजबजले आहे. शहरातील कचऱ्याचे ढीग पाहून सात्त्विक संताप करणारा रहिवासी स्वत: मात्र फेरीवाल्यांकडूनच खरेदी करतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, याचा विचार करण्यास तो तयार नसतो. आता ती विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. फक्त प्रत्येक रहिवासी, चाकरमान्याने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गोळवली गावाजवळ शिळफाटा मुख्य रस्त्यावर गावपाटीलकी असलेले पितापुत्र व्याजी पद्धतीने फेरीवाल्यांचा बाजार भरवीत आहेत. या पितापुत्राच्या पदरी तीनशे फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांना हे पितापुत्र व्याजाने पैसे देतात. त्यातून सामान खरेदी केली जाते. या फेरीवाल्यांचा माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना व्याजाने पैसे देण्याचा बिनभांडवली धंदा सुरू आहे. या ठिकाणी दर महिन्याला २१ लाखांची उलाढाल होते. त्यातील एक पैसाही पालिका किंवा सरकारी यंत्रणेच्या तिजोरीत जमा होत नाही. सरकारी यंत्रणेतील मातब्बर मात्र हप्तेखोरी करून या बाजाराला अभय देत आहेत. यांचाही बीमोड लोकांनी करणे आवश्यक आहे.

चांगले पर्याय निवडा

रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर थेट कल्याणमधील रेल्वे स्थानकाजवळील भाजीमंडईत जाऊन चांगली भाजी खरेदी करता येऊ शकते. डोंबिवलीत उर्सेकरवाडीतील मंडईत जाऊन भाजी खरेदी करता येऊ शकते किंवा विजेच्या खांबाच्या ओडाशाला गावाकडची मावशी ताजी भाजी घेऊन बसलेली असते. स्वस्त भाजीची दुकाने काही भागात सुरू झाली आहेत. डोंबिवलीत ब्राह्मण सभेसमोर जुन्नरचा ताजी भाजीपाला विक्रीसाठी असतो. भ्रमणध्वनी बिघाडाची समस्या असेल तर गल्लीबोळात भ्रमणध्वनी विक्रेते आणि दुरुस्तीची दुकाने आहेत. अख्खा मानपाडा रस्ता दर्जेदार चप्पल विक्रेत्यांनी गजबजलेला असतो. प्रत्येक रहिवासी, चाकरमान्याने आता मी फेरीवाल्यांकडून खरेदी करणार नाही, असा मनाशी संकल्प सोडला तरी, पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीसांवरील निम्मा भार कमी होणार आहे. एक दिवस, दोन दिवस सलग असे दहा दिवस जरी रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांकडून कुणीही खरेदीच केली नाही, तर हाच फेरीवाला हळूहळू आपल्या उपजीविकेचे अन्य पर्याय शोधेल किंवा अन्य भागांत व्यवसाय करण्याची मनाची तयारी करेल. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, शहाड परिसरातून नाशिक, मुंबई, पुण्याकडे जाणारा दररोजचा चाकरमानी हा सुशिक्षित, शहाणासुरता असल्याने त्यांना एकत्रित करून शपथ देऊन मी फेरीवाल्यांकडून खरेदी करणार नाही, असे हातावर तांदूळ देऊन वचनबद्ध करण्याची आवश्यकता नाही. कारण हाच रहिवासी नववर्ष चैत्र पाडव्याला कोणत्याही शपथा न देता हजारोच्या संख्येने कल्याण, डोंबिवलीत गुण्यागोविंदाने एकत्र जमतो. प्रत्येक चाकरमान्याने, रहिवाशांनी आपल्या शेजारी, मित्रांना जागृत करून रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेतला, तर तात्काळ नाही, पण हळूहळू कल्याण, डोंबिवली, टिटवाळा ही मुख्य शहरे फेरीवाल्यांच्या जंजाळातून मुक्त होण्यास विलंब लागणार नाही. पालिका, पोलीस संयुक्तपणे फेरीवाल्यांचा बाजार हटविण्यासाठी आक्रमक झाले आहेत. आता लोक या मोहिमेला किती हातभार लावतात, यावर त्यांची सत्त्वपरीक्षा अवलंबून आहे.