मीरा-भाईंदर महापालिकेचे दुर्लक्ष; रात्री उशिरा परतणाऱ्या महिलांच्या मनात भीती

भाईंदर :  भाईंदर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या नवघर रोड मार्गावरील पथदिवे बंद अवस्थेत असल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचे होत आहे. रस्त्यावर सर्वत्र अंधार पसरत असल्यामुळे अनैतिक घटना घडण्याची शक्यता वाढली असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भाईंदर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाला लागूनच नवघर रोड आणि बी पी रोड हे मुख्य मार्ग आहे. परंतु नवघर रोडला जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही दिवसापासून रात्रीच्या सुमारास अंधार असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

टाळेबंदी नियमात शिथिलता आल्यानंतर अनेक नागरिक कामाकरिता घराबाहेर निघत आहेत.  परंतु सायंकाळी ७ नंतर दुकाने बंद  करण्यात येत असल्यामुळे रस्त्यावर नागरिकांची रहदारी कमी प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत रस्त्यावर अंधार असल्याने रात्री उशिरा परतणाऱ्या महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे. मीरा भाईंदर शहरातील अनेक भागांमध्ये असेच चित्र आहे. रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कामांमुळे काही काळाकरिता पथदिवे बंद करण्यात येतात. महानगरपालिकेकडून पथदिव्याच्या वीज बिलाकरिता वार्षिक  ९० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. अशा परिस्थितीत त्या पथदिव्यांची योग्य देखरेखदेखील होत नसल्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आहे. या संदर्भात सा. बां. विभागातील कार्यकारी अभियंता दीपक खांबित याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या मार्गावर रात्रीच्या सुमारास औद्योगिक वसाहतीमधील कामगार आणि काही तरुण फिरत असतात. अनेक वेळा त्यांनी मद्य सेवन केले असल्याचा भास होतो. म्हणून या मार्गावर अंधार असल्यावर ये-जा  करण्यास भीती वाटते.

– रुपाली मोहिते,  स्थानिक रहिवाशी