महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती

भारतामधील तरुणाई मूलतत्त्ववाद्यांमुळे दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होत असल्याची बाब पुढे येऊ लागली असतानाच हा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पथनाटय़ स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तालयातील पाच परिमंडळ स्तरावर ही स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी दहशतवादाच्या अनुषंगाने चार विषयांची निवड करण्यात आली आहे.

आयसिस या दहशतवादी संघटनेने भारतामध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली असून मूलतत्त्ववाद्यांमुळे भारतामधील तरुण अशा संघटनेत सामील होऊ लागले आहेत. गेल्या वर्षभरात देशभरातील विविध तपास यंत्रणेच्या कारवाईतून ही बाब ठसठशीतपणे पुढे आली आहे. तसेच राज्यातील काही तरुण अशा संघटनांमध्ये सामील झाल्याचे समोर आले आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने विविध कार्यक्रम हाती घेतले असून त्याच्या माध्यमातून अशा संघटनांमध्ये तरुणांनी सामील होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात येत आहे.

दरम्यान, आयसिस यासारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेले तरुण कल्याण आणि मुंब्रा भागातील रहिवाशी असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. यामुळे राज्य शासनाच्या जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाविद्यालयांमध्ये पथनाटय़ स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे अशा पाच परिमंडळ स्तरावर या स्पर्धेच्या प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे. प्रत्येक परिमंडळाच्या प्राथमिक फेरीत दोन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. यानंतर पाचही परिमंडळातील दहा विजेत्यांमध्ये अंतिम फेरी घेऊन त्यामध्ये दोन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, विजेत्या स्पर्धकांच्या पथनाटय़ाची चित्रफीत करण्यात येणार असून ती जनजागृतीसाठी समाजमाध्यम आणि ठाणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येणार आहे. याशिवाय, परिमंडळातील विजेत्यांचे पथनाटय़ाचे प्रयोग महाविद्यालयांमध्ये दाखविण्यात येणार आहेत. दहशतवादी कृत्यांकडे तरुणांनी वळू नये म्हणून पथनाटय़ प्रयोगाच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

स्पर्धेची प्राथमिक फेरी

ठाणे आणि वागळे या परिमंडळामध्ये येत्या २३ फेब्रुवारीला तर भिवंडी आणि कल्याण या परिमंडळामध्ये २४ फेब्रुवारीला पथनाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहेत. तसेच उल्हासनगर परिमंडळामध्ये २५ फेब्रुवारीला स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. या स्पर्धेतील दहा विजेत्यांमध्ये अंतिम फेरी होणार असून त्या पुढील महिन्यात ठाणे शहरामध्ये होणार आहेत. मात्र, त्याची तारीख निश्चित झालेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

स्पर्धेचे विषय..

  • आधी राष्ट्र मग बाकी..
  • सामाजिक शिस्त आणि दहशतवादावर नियंत्रण
  • सक्तीचे लष्करी शिक्षण आणि अंतर्गत सुरक्षा
  • सोशल मीडिया आणि दहशतवादाचा धोका