ठाण्यातील इंदिरानगर, लोकमान्यनगर येथील रस्त्यांवर फेरीवाले दुतर्फा बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. पूर्वी पदपथ अडविणारे फेरीवाले आता थेट रस्त्यावरच आल्याने या परिसरात वाहनचालकांना नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांनी मध्यंतरी सुरू केलेली फेरीवालाविरोधी मोहीम थंडावल्याचे चित्र या परिसरात आल्यावर दिसते.
महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू होताच जयस्वाल यांनी फेरीवाला मुक्त ठाण्याची हाक देत रेल्वे स्थानक परिसरात मोठी मोहीम हाती घेतली होती. आयुक्तांच्या आदेशामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातील पदपथ आणि रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात सुरुवातीच्या काळात कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून मात्र हे चित्र पालटले असून शहरातील अनेक भागात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. ज्या रस्त्यांवरून एकावेळी दोन अवजड वाहने नेता येऊ शकतात, तिथे लहान वाहनांसाठीही प्रवास करणे जिकरीचे झालेले आहे. त्यामुळे रस्थानिक रहिवासी हैराण झाले असून जवळच असलेल्या शाळा, रुग्णालयांनाही फेरीवाल्यांचा फटका बसला आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष
इंदिरानगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एका बाजूला बाजार भरत होता. मात्र आता तिथे अनधिकृत फेरीवाल्यांनी आक्रमण केल्याने दोन्ही बाजूचा रस्ता फेरीवाल्यांनी व्यापला आहे. यामुळे संतापलेल्या स्थानिक रहिवाशांनी पालिका व स्थानिक पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असतानाही या बेकायदा फेरीवाल्यांवर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.

येथे फेरीवाले वाढले
नितीन कंपनी, रामचंद्र नगर, कामगार रुग्णालय, सावरकर नगर, इंदिरानगर, साठे नगर, लोकमान्य नगर