दुर्गाडी-रांजणोली रस्त्यावर पाच वर्षांत अडीचशे अपघात
कल्याणमधून कोनगावमार्गे भिवंडी आणि ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रांजणोली नाक्यापर्यंतचे पथदिवे बंद असल्याने हा मार्ग रात्रीच्या वेळी अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. या रस्त्यावर रात्रीच्या अंधारात गेल्या पाच वर्षांत अडीचशेहून अधिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये ५० जणांचे प्राण गेल्याची माहिती पुढे आली आहे. कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणे अथवा रस्ता ओलांडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती बनली आहे.
कल्याणच्या दुर्गाडी पुलावरून भिवंडीकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर रांजणोली नाक्यापर्यंत उभारण्यात आलेले पथदिवे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. या भागात दीड वर्षांपूर्वी पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र वीज पुरवठय़ाअभावी हे पथदिवे बंद असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. येथील ग्रामपंचायतींचा ना हरकत दाखला नसल्यामुळे या पथदिव्यांना वीजपुरवठा देण्यात आला नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
अंधारातून वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असून गेल्या पाच वर्षांमध्ये या भागात सुमारे अडीचशे अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने पथदिवे लावल्यानंतर गेल्या दोन वर्षांत ५५ अपघात घडल्याची माहिती यातून उघड झाली आहे. भिवंडी पूर्व विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जोशी यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. हे सगळे अपघात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळामध्ये घडले आहे. तर दिवसा होणाऱ्या अपघातांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कल्याणच्या दुर्गाडी पुलापासून भिवंडी-नाशिक बायपास रस्त्यावरील रांजणोली नाक्यापर्यंतचे पथदिवे तात्काळ सुरू करून येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून केली जात आहे.

दुर्गाडी ते रांजणोली नाक्यापर्यंत रात्रीच्या वेळी प्रवास करताना येथील अंधाराचा वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. गेल्य दीड वर्षांपासून याविषयी रस्ते विकास महामंडळ आणि महावितरणकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. प्रत्यक्ष कामापेक्षा टोलवाटोलवी अधिक होत असल्याने येथील निर्दोश नागरिकांना मात्र प्राण गमवावे लागत आहे.
– योगेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते