News Flash

ठाण्यात अवजड वाहतूक नियोजनाला हरताळ

अवेळी होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे शहरात ठिकठिकाणी कोंडी होते.

(संग्रहित छायाचित्र)

पालकमंत्र्यांसोबतची बैठकही निष्फळ

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलविलेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिली असून वेळीअवेळी होणारी अवजड वाहतूक, सकाळी गर्दीच्या वेळेत खड्डे बुजविण्यासाठी अडविले जाणारे रस्ते तसेच जिल्ह्य़ातील विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.

अवजड वाहतुकीसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे चालकांकडून पालन व्हावे यासाठी पालघर जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ सूचना देण्यात येतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

अवेळी होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे शहरात ठिकठिकाणी कोंडी होते. त्याचा फटका ठाणेकरांना बसू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवडय़ात संबंधित विभागांची बैठक घेऊन त्यात शहरातील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच सर्व संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांची समन्वयक अधिकारी म्हणून पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीत नेमणूक केली होती. वाहतूक कोंडीचे प्रश्न सोडविताना अडचणी आल्या तर या दोघांशी संबंधित यंत्रणांनी संपर्क साधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

  • मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव तीन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक ठाणे, कल्याण आणि भिवंडी शहरातून वळविण्यात आली आहे. ठाणे आणि घोडबंदर भागांतून रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तशी अधिसूचनाही वाहतूक पोलिसांनी काढली होती.

पुरेसे प्रयत्न नाहीत’

पहाटे ६ नंतर अवजड वाहने शहरात येऊन वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाकडून संबंधित यंत्रणांना संपर्क साधण्यात येतो. त्यानंतरही संबंधित यंत्रणांकडून अवजड वाहतुकीला रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत आणि ही वाहने अवेळी ठाणे शहरात प्रवेश करतात, अशी माहिती वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:58 am

Web Title: strike for heavy traffic planning in thane
Next Stories
1 नालासोपाऱ्यात नाकाबंदी
2 शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत
3 मीरा-भाईंदरच्या क्रीडासंकुलात उपाहारगृह
Just Now!
X