दहा महिन्यांत २,९१८ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

उपनगरी गाडय़ांमध्ये दरवाजामध्ये जागा अडवणे, आसने अडवून धरणे, प्रवाशांना उतरू न देणे, अरेरावी करणे असे प्रकार करणाऱ्या मुजोर प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने लगाम घातला आहे. गेल्या १० महिन्यांत असे प्रकार करणाऱ्या २,९१८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

वसई-विरार व तसेच पालघरमधून दररोज लाखो प्रवासी उपनगरी गाडय़ांद्वारे मुंबईत कामानिमित्त जातात. मात्र या प्रवाशांना काही वेळा मुजोर प्रवाशांचा त्रास सहन करावा लागतो. दरवाजात उभे राहून इतर प्रवाशांचा मार्ग अडविणे, लोकल डब्ब्यातील बसण्यासाठीची आसने अडवणे, लोकलमधून उतरू न देणे, अरेरावी करणे असे अनेक प्रकार उपनगरी गाडय़ांमध्ये घडतात. अनेकदा हाणामारीचे प्रसंगही घडतात. याबाबतच्या अनेक तक्रारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आल्या होत्या. त्यावर उपाययोजना म्हणून रेल्वे सुरक्षा बलाने विशेष पथके स्थापन करून सकाळी व संध्याकाळी कारवाई करण्यास सुरुवात केली. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत विरार ते चर्चगेट यादरम्यान २,९१८ मुजोर प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख ६६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली.

जनजागृती मोहीम

लोकलने विरार ते चर्चगेट असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र या सर्व समस्या सोडवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल गेल्या वर्षांपासून विविध मोहिमा राबवत आहे. तरीही लोकलमध्ये प्रवाशांना चढू न देणे, अरेरावी, जागेवरून वादविवाद, रेल्वे रूळ ओलांडणे, अपघात असे प्रकार घडत असतात. हे प्रकार थांबविण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या प्रवाशांना अशा प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे, त्यांनी तात्काळ रेल्वे सुरक्षा दलाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.

रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकांनी विविध स्थानकांमध्ये कारवाई केली. प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून उपाययोजना आणि कारवाई सुरूच आहे.

यश मिश्रा,  सहाय्यक सुरक्षा आयुक्त, विरार