परिवहन कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

विरार : वसई-विरार महापालिका परिवहन सेवा कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होता. परिवहन कर्मचारी आणि महापालिका प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असली तरी त्याबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. बुधवारी काही कर्मचाऱ्यांनी बससेवा सुरू केली होती. मात्र त्यांना अन्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनीही गुरुवारी बस आगारातच उभ्या केल्या.

पगारवाढ आणि इतर मागण्यासाठी महापालिका परिवहन सेवेच्या ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. सध्या पालिका ठेकेदार आणि कर्मचारी यांत समन्वय साधला गेला नसल्याने या संपाचा तिढा वाढत आहे. सफाई कामगारही या आंदोलनात उतरल्याने हे आंदोलन अधिक व्यापक झाले आहे. सध्या पालघरचे जिल्हाधिकारी तथा पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेचे सचिव पुताळाजी कदम यांनी सांगितले.

गेल्या महिन्यातही असाच प्रकारचा संप पुकारला गेला होता. यावेळी ठेकेदाराने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून महिनाभरात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महिना उलटूनही वचनपूर्ती झाली नसल्याने संतप्त कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहेत. या संपाचा ताण आता सामान्य नागरिकांवर पडत आहे. बससेवा बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना अतिरिक्त भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. संपावर ठराविक तोडगा निघत नसल्याने ठेकेदाराने महापालिकेला करारातून मुक्त करण्याचे पत्र दिले आहे.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी ४० बस रस्त्यावर होत्या. गुरुवारी मात्र एकही बस रस्त्यावर धावली नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता परिवहन सेवा बंद झाल्याने सामान्य प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. वसई आणि आसपासच्या गावात प्रवासाठी वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा ही सोयीस्कर असल्याने दररोज हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. अनेकांनी मासिक भाडे पास काढले असून त्यांचे नुकसान होत आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने त्यांना अतिरिक्त पैसे खर्च करून शाळेत जावे लागत आहे.

परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यावर तोडगा काढून बससेवा सुरू करण्यात येईल. – प्रीतेश पाटील, परिवहन सभापती