27 November 2020

News Flash

फुलपाखरांच्या जगात : स्ट्रीप्ट टायगर

भारत, श्रीलंकापासून दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्रामध्ये हे फुलपाखरू अगदी सर्रासपणे आढळते.

स्ट्रीप्ट टायगर किंवा कॉमन टायगर पडण्याचे कारण म्हणजे याच्या पंखावर वाघाच्या अंगावर असतात तसे चक्क पिवळे काळे पट्टे असतात.

मध्यम आकाराच्या या फुलपाखराचे नाव स्ट्रीप्ट टायगर किंवा कॉमन टायगर पडण्याचे कारण म्हणजे याच्या पंखावर वाघाच्या अंगावर असतात तसे चक्क पिवळे काळे पट्टे असतात.
भारत, श्रीलंकापासून दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्रामध्ये हे फुलपाखरू अगदी सर्रासपणे आढळते. साधारण: मध्यम आकाराच्या फुलपाखरांच्या पिवळ्या पंखांवर काळे पट्टे असतात. पुढील पंखाची बाहेरची टोकं ही काळ्या रंगांची असतात आणि त्याच्यावर पांढऱ्या मोठय़ा ठिपक्यांची रांग असते. शिवाय अशाच पण छोटय़ा पांढऱ्या ठिपक्यांची माळ मुख्य भागाच्या दोन्ही बाजूस असते. मागील पंखांच्या (हाईड विंग) कडांनाही अशीच काळ्या पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी असते. अमेरिकन मोनार्च या फुलपाखराशी याचं बरंच साधम्र्य असते.
नर आणि मादी दोन्ही फुलपाखराचे पंख सारखेच असतात. शिवाय या पंखाच्या खालच्या बाजूसही असेच पण फिकट पट्टे असतात.
या फुलपाखरांच्या माद्या अस्केपिएडीसी कुळातील झाडांच्या पानावर अंडी घालतात. अंडय़ामधून बाहेर येणारे सुरवंट हे काळ्या रंगाचे असतात आणि त्यांच्या अंगावर पांढऱ्या पिवळ्या रेषा आणि ठिपके असतात. सुरवंटची वाढ पूर्ण झाल्यावर हे पिवळे ठिपके असलेल्या हिरव्या कोषात स्वत:ला गुंडाळून घेतात.
सुरवंट ज्या झाडांची पाने खातात, त्यात विषारी द्रव्य असतात ती सुरवंटाच्या आणि आतील फुलपाखरांच्या शरिरात जमा होतात. यामुळे ही फुलपाखरे विषारी बनतात. यांना खाण्यासाठी म्हणून पक्षी, सरडे वगैरे कोणी पकडले तरी यांच्या शरीरास असणाऱ्या दर्पामुळे ते यांना लगेच सोडतात. अशावेळी पंखाना थोडीफार इजा झाली असली तरी ही फुलपाखरं शक्ती गोळा करून पळून जातात.
त्यांच्या या गुणधर्मामुळे ही फुलपाखरं निसर्गात अगदी स्वच्छंदपणे, बागडत असतात. त्यांच्या उडणं हेसुद्धा संथ गतीने रमतगमत असं असते. या फुलपाखरांना मध्यम ते भरपूर पाऊस असणारी पानगळी किंवा सदाहरित झाडांची जंगलं मानवतात आणि म्हणूनच आपला सह्य़ाद्री आणि त्यांच्या सभोवतालच्या प्रदेशात ही फुलपाखरं हमखास आढळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:44 am

Web Title: striped tiger butterfly
टॅग Butterfly
Next Stories
1 सहज सफर :चल, आंब्याच्या वनात जाऊ!
2 शहरबात कल्याण : ‘झोपु’ योजनेची वाताहत
3 वेध विषयाचा : निवडणुकांच्या हंगामात घोषणांचा सुकाळ!
Just Now!
X