गेल्या दहा महिन्यांत बाराशेहून अधिक जणांना दंड; रेल्वे सुरक्षा दलाची मोहीम

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या १० महिन्यांमध्ये आरपीएफने १ हजार २५५ जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख २ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र रेल्वे रुळांलगत सुरक्षा भिंत नसल्याने अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत स्थानकात प्रवेश करत असतात. रेल्वे रूळ ओलांडल्याने लोकल गाडय़ांच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी मध्य रेल्वेकडून जनजागृती करण्यात येते. मात्र, यावर उपाययोजना करणे रेल्वे प्रशासनानाला अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांकडून रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी आरपीएफकडून आता ठाणे स्थानक परिसरात तसेच रेल्वे रूळ ओलांडले जाणाऱ्या ठिकाणी गस्ती घालण्यास सुरुवात केली आहे. आरपीएफने गेल्या १० महिन्यांमध्ये तब्बल १ हजार २५५ प्रवाशांविरोधात कारवाई केली आहे. २०१८ मधील जानेवारी ते डिसेंबरमध्ये हा आकडा केवळ ६०१ इतकाच होता. या वर्षी मात्र यात दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या वर्षी केलेल्या कारवाईत आरपीएफने ३ लाख२ हजार ३०० रुपयांची दंडवसुलीही केली आहे. या कारवायांमुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या संख्येत घट होणार असल्याचा दावा आरपीएफकडून करण्यात येत आहे.

अपंग डब्यातील घुसखोरांवर कारवाई

अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या धडधाकट प्रवाशांवरही आरपीएफने कारवाई केली असून १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ४ हजार २६८ जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून १२ लाख ५२ हजार २०० रुपये दंडाची वसुली केली आहे. तर महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या २५ जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.