अवजड वाहनांच्या बेकायदा वाहतुकीला अखेर लगाम; ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पहारा

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : दिवाळीच्या तोंडावर मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख शहरांमधील महामार्ग तसेच मुख्य मार्गावर होणारी वाहनकोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उशिरा का होईना, जोरदार मोहीम हाती घेतली आहे. ठरावीक वेळेशिवाय या मार्गावर बेकायदा पद्धतीने ये-जा करणारी अवजड वाहने रोखण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मुख्य प्रवेशद्वारांवर पहारा ठेवला जात आहे.

ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात प्रवेशबंदी असतानाही छुप्या पद्धतीने अवजड वाहतूक सुरू आहे. ही सर्व अवजड वाहने ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील मुख्य प्रवेशद्वारांवर मोकळ्या जागांमध्ये रोखून धरली जात आहेत. ठरावीक वेळेशिवाय ही वाहने ठाणे पोलीस आयुक्तलायच्या हद्दीत सोडली जाऊ नये यासाठी पालघर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि नव्याने स्थापन झालेल्या वसई-विरार पोलिसांसोबत समन्वय साधला जात आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना रात्री १० ते पहाटे पाच आणि दुपारी १२ ते चार या वेळेतच वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी काढली आहे. सुरुवातीच्या काळात या अधिसूचनेचे तंतोतंत पालन करण्यात आले. त्यानंतर छुप्या पद्धतीने अवजड वाहनांचा बेकायदा प्रवेश सुरूच होता. करोनाच्या प्रादुर्भावानंतर रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्याने अवजड वाहने ठरावीक वेळेव्यतिरिक्त सर्रास रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र होते. कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर या अवजड वाहनांची वाहतूक कल्याण- शिळफाटा मार्गावर बंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या पंधरवडय़ापासून कल्याण-शीळ मार्गावर वाहनकोंडी कमी झाली आहे. असे असले तरी इतर ठिकाणी या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.

भिवंडी, शिळफाटा, घोडबंदर येथील नागलाबंदर परिसरात अवजड वाहनांना ठाणे पोलिसांच्या हद्दीत ठरावीक वेळेशिवाय आल्यास रोखण्यात येत आहे. रात्री १० ते पहाटे पाच आणि दुपारी १२ ते चार या वेळेतच वाहनांना पुढे सोडण्यात  येत आहे. तसे आदेश वाहतूक पोलिसांचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून वाहतुकीवरही त्याचा चांगला परिणाम दिसत आहे.

नेमके काय होते?

नवी मुंबई, पालघर, वसई-विरार भागातून येणारी अवजड वाहने ठाण्याच्या दिशेने सोडण्यात येत असतात. त्यामुळे अनेकदा ठरावीक वेळेव्यतिरिक्त अवजड वाहने छुप्या पद्धतीने ठाणे पोलिसांच्या हद्दीत प्रवेश करत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर येत होता. आता हद्दीच्या प्रवेशद्वारावरच पोलीस उभे असतात. एखादे अवजड वाहन हद्दीत प्रवेश करत असल्यास त्याला एका कडेला उभे केले जाते. त्यानंतर रात्री १० ते पहाटे पाच आणि दुपारी १२ ते चार वाजता सोडण्यात येत आहे.

अवजड वाहनांना ठाण्यात ठरावीक वेळेशिवाय प्रवेशास बंदी आहे. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांचे पथक क्षेत्राच्या प्रवेशद्वारावर कार्यरत असते. छुप्या पद्धतीने येणाऱ्या अवजड वाहनांना आम्ही हद्दीत येण्यापासून रोखत असून वाहतुकीत अडथळा होणार नाही अशा ठिकाणी उभे करत आहोत

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.