उपनगरी गाडीच्या धडकेत विठ्ठलवाडीत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर- वांगणी दरम्यान गाडीतून पडून प्रीती चव्हाण या विद्यार्थिनीचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेला ती बसणार होती. सोमवारी दुपारी कर्जत गाडीने जात असताना ती बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान गाडीतून पडून गंभीर जखमी झाली. तिला कल्याणच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
प्रीती ही बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोड परिसरात राहत होती. ती खामकर विद्यालयाची विद्यार्थिनी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मृत्यूमुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.