ठाण्यातील स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

ठाणे : कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी शनिवारी आणि रविवारी मोठय़ा उत्साहात पार पडली. प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या चार महाविद्यालयांमधील विद्यार्थी कलाकार जोरदार तयारी करत आहे. तर विभागीय फेरीपर्यंत पोहोचू न शकलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही या अपयशाचा बाऊ न करता हा अनुभव खूप काही शिकवणारा आणि अविस्मरणीय होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धामध्ये मानाची स्पर्धा अशी अल्पावधीतच ओळख निर्माण करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. यामधून निवडण्यात आलेल्या चार महाविद्यालयांमध्ये ठाणे विभागीय अंतिम फेरीतून महाअंतिम फेरीत दाखल होण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या फेरीत आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाची ‘हमीनस्तू’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. या एकांकिकेत मुख्य पात्र साकारणारी नेहा म्हात्रे हिचे स्पर्धेत सहभागी होण्याचे पहिलेच वर्ष आहे. ‘प्राथमिक फेरीत एकांकिका वेळेत पूर्ण व्हायला हवी, याबाबत मनात थोडे दडपण होते. मात्र सादरीकरणाला सुरुवात केल्यानंतर हे दडपण कमी झाले,’ असे नेहा म्हणाली. सर्व परीक्षकांनी एकांकिकेबाबत सकारात्मक प्रतिसाद देतानाच त्यात आवश्यक ते बदलही सुचवले. या बदलांवर काम सुरू असल्याचे नेहा म्हणाली.

‘लोकांकिकाच्या प्राथमिक फेरीसाठीचे आयोजन अतिशय उत्तम करण्यात आले होते. तो अनुभव अविस्मरणीय आहे,’ असे विभागीय फेरीत पोहोचलेल्या डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाची ‘सतराशे साठ दलिंदर’ या एकांकिकेतील कलाकार शिवाली चौधरी हिने सांगितले. ‘एकांकिका पूर्ण झाल्यानंतर परीक्षकांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सुचवलेल्या मार्गदर्शनाचा यापुढे एकांकिका करताना नक्कीच फायदा होईल,’ असे ती म्हणाली. उल्हासनगर येथील एस.एस.टी महाविद्यालयाची ‘हित्यास भूगोल’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. ‘लोकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर अभिनय करण्याची संधी मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. आमच्या एकांकिकेचा विषय परीक्षकांना आवडला. एकांकिकेतील प्रत्येक संवादाला परीक्षकांची दाद मिळाल्यामुळे आमचा उत्साह दुणावला आहे,’ असे या एकांकिकेतील अभिनेता परिक्षित ठोंबरे याने सांगितले.

ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘भोकरवाडीचा शड्डू’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा ही मानाची स्पर्धा असल्याने एकांकिका करताना एक वेगळेच दडपण असल्याचे मत या एकांकिकेत अभिनेत्याची भूमिका करणाऱ्या संजय गोसावी याने सांगितले.

विभागीय अंतिम फेरी गुरुवारी

लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार असून या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका गडकरी रंगायतन येथे कार्यक्रम सुरू  होण्याच्या वीस मिनिटे अगोदर उपलब्ध असणार आहेत.

प्रायोजक

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पर्धेचे ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकिज’ हे सहप्रायोजक आहेत. तर, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे पॉवर्डबाय पार्टनर आहेत. तसेच, ‘रणथंबोर सफारी’ आणि ‘ईशा नेत्रालय’ हे या स्पर्धेचे रिजनल पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरीस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडत आहे.