ठाण्यात शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात मुली, महिलांवर ‘हल्ले’
रंगांचा, आनंदाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होळी आणि धूलिवंदनाच्या सणाला अद्याप तीन आठवडे शिल्लक असले तरी ठाण्यात आतापासूनच रस्त्यांवरून चालवणाऱ्यांवर पाण्याने भरलेले फुगे फेकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अभद्र, अनिष्ट, वाईट गोष्टींना होळीत पेटवून रंगांच्या रूपात मांगल्याचे स्वागत करणाऱ्या या सणाला त्यामुळे गालबोट लागण्याची भीती आहे. धुळवडीच्या काळात फुगाफेक करण्यास पोलिसांनी सक्त प्रतिबंध केला असतानाही आतापासून शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पादचाऱ्यांवर, विशेषत: मुली व महिलांवर, फुगे फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थिनींवरही टवाळखोरांनी फुगाफेक केल्याने त्यांच्यात असुरक्षिततेचे वातावरण आहे.
होळी, रंगपंचमीच्या दिवशी धावत्या लोकलगाडीवर किंवा रस्त्याने जाणाऱ्यांवर फुगे फेकण्याचे प्रकार नित्याचेच आहे. विशेषत: यात महिलावर्गाला लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर ‘फुगेखोरां’ना आवरण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमण्यास सुरुवात केली. त्यामुळे गतवर्षी धुळवडीच्या काळात अशा प्रकारच्या अप्रिय घटना फारशा घडल्या नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील विद्यार्थिनी, तरुणी, महिलांच्या अंगावर फुगे फेकण्यात आल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अशा घटना जास्त असल्याचा अनुभव काही महिलांना ‘लोकसत्ता ठाणे’कडे व्यक्त केला.
या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी गतवर्षी रेल्वे पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली होती. या मोहिमेचा बऱ्याच अंशी सकारात्मक परिणामही दिसून आले होते. ही जनजागृतीची मोहीम ८ मार्च रोजी महिला दिनाच्या दिवशी अधिक आग्रही पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांनी दिली. पोलीस मित्र प्रवासी संघटना पदाधिकारी यांनीही या मोहिमेत सामील करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. होळीच्या दिवशी संपूर्ण झोपडपट्टय़ांमध्ये बंदोबस्त करणार असल्याचे सांगत यासाठी शहर पोलीस, वाहतूक पोलीस यांचीही मदत घेणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

‘थेट पोलिसांना संपर्क करा’
फुगाफेकीच्या घटनांना पायबंद बसलाच पाहीजे यासाठी दर वर्षी पोलिसांकडून कडक मोहीम राबवली जाते. महाविद्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार घडल्याने संबंधितांनी तातडीने नियंत्रण कक्षाशी २५४४३६३६ या क्रमांकावर संर्पक साधावा, असे आवाहन ठाणे वाहतूक पोलीस विभागाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केले आहे.

फुगाफेकीची ठिकाणे
* ज्ञानसाधना महाविद्यालय.
* जोशी बेडेकर महाविद्यालय
* ज्ञानदेव विद्यामंदिर, सावरकर नगर, ठाणे
* ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान
* वागळे इस्टेट बस डेपो.