जिल्हा क्रीडा विभाग कार्यालयातील बदल्यांचा विद्यार्थ्यांना फटका

दहावी, बारावी परीक्षांच्या निकालानंतर एकीकडे विद्यार्थ्यांना पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी धावपळ करावी लागत असताना क्रीडापटू विद्यार्थ्यांच्या नशिबी ठाणे जिल्हा क्रीडा विभागाचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाच टक्के गुणांच्या सवलतीवर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची मोहोर उमटवण्यासाठी हे विद्यार्थी विभाग कार्यालयांकडे धाव घेत आहे. मात्र, या विभागातील पाच कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली झाल्याने या विद्यार्थ्यांना दररोज या कार्यालयात खेटे मारावे लागत आहे.

राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळविणाऱ्या दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी पाच टक्के गुणांची सूट दिली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धाचे प्रमाणपत्र आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची सही, शिक्का असलेला शिफारस अर्ज महाविद्यालयात सादर करावा लागतो. खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या नैपुण्याचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा विभागात सादर करायचे असते. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या अर्जावर शिफारसपत्र दिले जाते. मात्र, हे शिफारसपत्र देण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप होत आहे.

कार्यालयातील एकाच वेळी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे हा प्रकार घडत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सद्य:स्थितीत या कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी आणि एक कर्मचारी एवढेच मनुष्यबळ आहे. त्यातही क्रीडा अधिकारी मंत्रालयात व्यस्त असल्याने येथील कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. सध्या क्रीडा धिकारी कार्यालयात सुमारे सातशे हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. खेळाडूंचे अर्ज जमा केल्यानंतर त्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाते. तसेच प्रमाणपत्रे पाहून विद्यार्थ्यांच्या अर्जावर जिल्हा क्रीडा अधिकारी स्वाक्षरी करतात. मात्र, यंदा ही संपूर्ण प्रक्रिया रखडत चालली आहे.

मनुष्यबळ कमतरता पूर्वीपासूनच

ठाणे क्रीडा विभागामध्ये यापूर्वी क्रीडा अधिकाऱ्यांसह क्रीडा मार्गदर्शक आणि कर्मचारी असा ७ जणांचा कर्मचारीवर्ग होता. त्यातील पाच कर्मचाऱ्यांची बदली होऊन आता केवळ क्रीडाधिकारी आणि एक कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी खेळाडूंच्या प्रवेशाची सर्व कामे अडून बसली आहेत. शासकीय नियमांप्रमाणे एका कार्यालयातील ३० टक्के कर्मचाऱ्यांची बदली करणे योग्य ठरत असते. मात्र त्यापेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांची बदली झाल्याचा राज्यातील हा पहिलाच प्रकार असल्याचा आरोप होत आहे.

वर्षभर खेळासाठी प्रचंड मेहनत करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा विभागाकडून तात्काळ मदत मिळण्याची गरज असताना इथे मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे खेळाडूंना मनस्ताप सहन करावा लागत असून त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडा किरकीर्दीवरही होऊ शकतो. हे खेळाडूंचे नुकसान करणारा प्रकार असून असे प्रकार टाळण्याची गरज आहे.

– अविनाश ओंबासे, सदस्य, राज्य क्रीडा धोरण समिती

सध्या येथील ६ पैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. दिवसाला १०० अर्जावर मी स्वाक्षरी करत असून विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. दर तीन वर्षांनी बदल्या होत असतात त्याच नियमाने या बदल्या झाल्या आहेत.

– प्रमोदिनी अमृतवडे, क्रीडा अधिकारी