स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज स्पर्धेत सहभागी

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या १० विद्यार्थ्यांनी उपग्रह बनविण्यात यश मिळविले आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडियातर्फे आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज स्पर्धेत हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे पेलोड उपग्रह एकाच वेळी हेलियम फुग्याच्या द्वारे अवकाशात सोडले जाणार आहेत, अशी माहिती पालिका शिक्षण मंडळातील विस्तार अधिकारी विजय सरकटे यांनी दिली.

शालेय शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांमध्ये अवकाश तंत्रज्ञान, अवकाश शोध, संशोधन विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनतर्फे उपग्रह तयार करण्याचा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत २५ ग्रॅम ते ८५ ग्रॅम वजनाचे १०० पेलोड उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. पालिकेच्या विद्यार्थ्यांचा हा कल्पकतेमधील उपक्रम एक जागतिक विक्रम होण्याची शक्यता आहे, असे विस्तार अधिकारी विजय सरकटे यांनी सांगितले.

सुजल गोठणकर, पंढरीनाथ शेळके, प्रथमेश घावट, दीप कडव, नवाज शेख, गौतम इंगोले, कशीश शेख, माणिक राठोड, बुशरा आलम, अफरोज शेख अशी सहभागी विद्यार्थ्यांची नावे आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले लहान १०० उपग्रह हेलियम फुग्याच्या साहाय्याने ३८ हजार फू ट उंचीवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ७ फेब्रुवारी रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथून उड्डाणाचा कार्यक्रम होणार आहे.