शहापूर तालुक्यातील शेणवे भागामध्ये असणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता १०वी तील आदिवासी मुलीने गणपतीच्या सुट्टीमध्ये गावी गेल्यावर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घटनेची कोणतीही माहिती सरकार यंत्रणेला न देता त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून या तपासासाठी जमिनीत गाडलेला मृतदेह बाहेर काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

शहापूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शेणवे येथील कन्या आश्रमशाळेत ती शिक्षण घेत होती. गणपतीची सुट्टी संपल्यावर देखील दहावीतील एक विद्यार्थिनी आश्रमशाळेत आली नाही म्हणून शिक्षक शहापूर तालुक्यातील रास या गावात तिला आणण्यासाठी गेले. त्यावेळेस तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी आदिवासी विकास प्रकल्पाला ही माहिती दिली आहे.

११ सप्टेंबरला आत्महत्येची घटना घडून देखील गावातील पोलीस पाटील यांनी देखील वासिंद पोलीस ठाण्यात खबर देण्याचे टाळले होते. बुधवारी शहापूरचे तहसीलदार तथा तालुकास्तरीय समिती सदस्या नीलिमा सूर्यवंशी आणि शहापूरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी यांनी दुपारी शेणवे येथील कन्या आश्रमशाळेला भेट देत घडलेल्या घटनेची माहिती घेत, थेट मुलीच्या रास गावी त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली.

अचानक असे काय झाले की मुलीला टोकाचे पाऊल उचलावे लागले? परस्पर अंत्यविधी पार पडला कसा? मृतदेह रुग्णालयात का नेण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने सूर्यवंशी यांनी वासिंद पोलिसांना मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाचे आदेश दिले आहेत.