परीक्षा निश्चित नसल्याने गावीही जाता येईना

वसई: परराज्यातील मजूर आपल्या गावी परतत असले तरी परराज्यातून आलेले विद्यार्थी परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे अडकले आहे. परीक्षा कधी होईल हे माहीत नसल्याने त्यांना गावी जाता येत नाही आणि इथे पैशाअभावी त्यांचे हाल होत आहेत.

परराज्यातील हजारो विद्यार्थी मुंबईत शिक्षणासाठी येत असतात. मुंबई शहर तसेच उपनगरात मिळेल त्या महाविद्यालयात नाव नोंदवून शिक्षण घेत असतात. काही विध्यार्थी नातलगांकडे तर काही विद्यार्थी स्वतंत्र खोली घेऊन राहत असतात. पदवीधर शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील अनिश्चित काळाकरिता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.

घरून येणारे पैसे बंद झाले आहेत. अनेक विद्यार्थी शहरात काम करून पैसे कमवतात आणि शिकत आहेत. टाळेबंदीमुळे काम बंद झाले आहे. गरीब विद्यार्थ्यांना गावाहून येणारे पैसे बंद झाल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने परराज्यात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मंजुरी दिली आहे. श्रमिक ट्रेन सोडल्या आहेत. मात्र गावी गेलो आणि परीक्षा जाहीर झाल्या तर काय करायचे असा प्रश्न या विद्यार्थ्यांपुढे पडला आहे.

शासनाने किमान परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले तर त्या कालावधीत आम्ही गावी जाऊन येऊ  शकतो असे संदीप पांडे या विद्यार्थ्यांने सांगितले. आमच्याकडे पैसे संपले आहेत. काही कामही करता येत नाही, त्यामुळे काय करायचे असा प्रश्न पडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.