६२ लाख रुपयांची मदत; ठाण्यात देणगीदार, हितचिंतकांचा मेळावा
काळानुसार जीवनशैली आणि व्यवहार बदलणे अपरिहार्य असले तरी सामाजिक भावनेचा आणि कृतज्ञतेचा संस्कार कायम ठेवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी ठाण्यात एका समारंभात केले. टीजेएसबी बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कर्वे यांच्या पुढाकाराने गेली चार वर्षे विविध सामाजिक संस्थांना परिचित दात्यांकरवी मदत मिळवून दिली जाते. या योजनेत यंदा विविध विषय शाखांमधील १२१ विद्यार्थ्यांना ६२ लाख रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमातील दाते, पालक, विद्यार्थी आणि हितचिंतकांचा एक स्नेहमेळावा नुकताच पार पडला. या समारंभास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध देशपांडे, उद्योजक दीपक घैसास पाहुणे म्हणून उपस्थित होते. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणाचेही झपाटय़ाने व्यापारीकरण झाले आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक कारणाने अनेकांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना हात देणारी रवींद्र कर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेली चळवळ निश्चितच स्तुत्य आहे, असेही देशपांडे म्हणाले.
मुंबई विद्यापीठातर्फे ठाणे-पालघर जिल्ह्य़ात शंभर एक जागेवर कौशल्यावर आधारित विविध अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देशमुख यांनी या वेळी दिली. रवींद्र कर्वे आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या गुणवत्ता शोध मोहिमेचे कौतुक करून उद्योजक दीपक घैसास यांनी त्यांना करिअर मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली.