tv09२७ फेब्रुवारी हा सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, कवी मा. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. या निमित्ताने शाळा-शाळांतून कार्यक्रम साजरे होतात. ठाण्यातील (वसंत विहार) विभागातील अनमोल विद्यामंदिर शाळेमध्ये मराठी दिनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते. पालखीमध्ये ज्ञानेश्वरी, गीता इ. ग्रंथ ठेवले जातात आणि ढोलताशांच्या गजरात दिंडी काढली जाते. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचा परिचय आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळा विशेषत्वाने प्रयत्नशील आहे. शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमाद्वारे लेखक, कवी यांच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. मुलांना लिहिण्याची प्रेरणा मिळावी, त्यांच्यातील गुणांना वाव मिळावा म्हणून वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर महिन्याला विद्यार्थ्यांनी एक पुस्तक वाचून त्यावर आपल्या शब्दांत त्याच्याविषयी लिहायचे, असा उपक्रम इथे राबविला जातो. मुलांनी अशा लिखाणाच्या वह्य़ा तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी निबंध, काव्यलेखन, वक्तृत्व इ. स्पर्धा आयोजित केल्या जातात.
मराठी शाळांची संख्या वेगाने घटत आहे. या समस्येकडे सर्वाचे लक्ष वेधण्यासाठी अनमोल शाळेचे विद्यार्थी एक पथनाटय़ सादर करतात. एका विभागाची निवड करून विद्यार्थी स्वत: तेथे जाऊन हे पथनाटय़ सादर करतात.
मुलांमधील सर्जनशीलतेला वाव देणारे ‘अनमोल भरारी’ हे मासिक दरवर्षी काढले जाते.
कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि शालेय पातळीवरील विकासासाठी पोषक वातावरण प्राप्त व्हावे म्हणून अनमोल विद्यामंदिर शाळेतर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.
वर्षभर अनेकविध उपक्रम, स्पर्धा, प्रदर्शने याशिवाय वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबविण्याचा शाळा प्रयत्न करते. इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राहक पंचायत संस्थेचे तज्ज्ञ येऊन मार्गदर्शन करतात. ग्राहक, त्यांचे हक्कव कर्तव्ये, भेसळ म्हणजे काय आणि ती कशी ओळखावी? चांगली जाहिरात कोणती इ. विषयांवरील भाषणांवर आधारित विद्यार्थ्यांनी टिपणवह्य़ा तयार केल्या आहेत.
विद्यार्थ्यांना निसर्गाची ओळख आणि जतन, संवर्धन याचे महत्त्व कळावे म्हणून स्लाइड शो, शॉर्टफिल्म, प्रात्यक्षिके, तज्ज्ञांची व्याख्याने सातत्याने आयोजित केली जातात. पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याची कार्यशाळा हा मुलांसाठी एक वेगळा अनुभव होता. मुलांनी स्वत: गणपती तयार केले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनादेखील त्याविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला.
पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून छोटीशी बाग शाळेत आकारास येऊ पाहते आहे. तुळस, गवती चहा, कडुनिंब, जांभूळ इ. औषधी वनस्पती/ झाडे यांची रोपे सध्या मुले वाढवत आहेत. ९ वीच्या विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना या कामासाठी दिवस ठरवून देण्यात आले आहेत.
शाळेतर्फे गेल्या वर्षी भिवंडी रोड, तर या वर्षी खेवरा सर्कल ते हॅपी व्हॅली भागात रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आली आहेत.
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत शाळेतर्फे गांधीनगर ते खेवरा सर्कल भागाची स्वच्छता करण्यात आली आणि तेथे काही कचराकुंडय़ाही ठेवल्या आहेत.
विद्यार्थ्यांना बँकांच्या व्यवहारांची माहिती व्हावी आणि बचतीचे महत्त्व कळावे म्हणून त्यांची बँकेत बचत खाती उघडण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थी स्वत: बँकेत जाऊन पैसे जमा करतात.
शालान्त परीक्षेत विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे म्हणून शाळेतच मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. मन:शांती कशी राखावी, ताणतणावांना कसे सामोरे जावे, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेला सामोरे जाताना इ. विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. याव्यतिरिक्त विविध विषयांवर जेणेकरून समाजातील विविध घडामोडींविषयी त्यांना माहिती व्हावी म्हणूनही सातत्याने मार्गदर्शन केले जाते. विविध इयत्तांसाठी त्यासाठी वार ठरवून ठेवले जातात. विद्यार्थ्यांना इंग्रजीचे दडपण वाटू नये म्हणून इंग्लिश स्पीकिंग कोर्स एका समाजसेवी संस्थेच्या साहाय्याने शाळेत राबविला जात आहे.
दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते.
गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्राचे व्यावसायीकरण झाल्याने मुलांना घडविणारे ध्येयप्रेरित शिक्षकांचे प्रमाणही कमी झाले आहे. या पाश्र्वभूमीवर कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील अनमोल विद्यामंदिर शाळा मनाला दिलासा देऊन जाते. शाळेचे संस्थापक, शिक्षक, कर्मचारीवर्ग हे म्हणूनच अभिनंदनास पात्र ठरतात.
हेमा आघारकर

vaishali darekar s campaign, bjp mla ganpat gaikwad wife, bjp mla ganpat gaikwad wife to media,
मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Thakur College viral video
मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध महाविद्यालयात पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती, ओळखपत्र जप्त करून…