मराठी विज्ञान परिषदेकडून आयोजित मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
उन्हाळ्याच्या सुट्टीत हाती असलेला विद्यार्थ्यांचा मोकळा वेळ सार्थकी लागावा आणि त्यांना विज्ञानाची गोडी लागावी, या हेतूने येथील मराठी विज्ञान परिषदेच्या शाखेने आयोजित केलेल्या विज्ञान रंजन मेळाव्यास खूपच चांगला प्रतिसाद लाभला. कानसई विभागातील भाऊसाहेब परांजपे विद्यालयाच्या हेडगेवार सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी अतिशय रंजक पद्धतीने वैज्ञानिक संज्ञा समजावून घेतल्या.
खगोल अभ्यासक प्रदीप नायक यांनी ‘अंतराळात आपली एकमेव जीवसृष्टी आहे का?’ या सूत्रास धरून त्यांनी अतिशय रोचक विवेचन केले. त्यानंतरच्या सत्रात निसर्गतज्ज्ञ ऋतुराज जोशी यांनी जैवविविधतेचे महत्त्व पटवून दिले. जैवविविधतेसाठी श्रीमंत मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाटात निरनिराळ्या परिसंस्था कशा पद्धतीने काम करतात, येथील वनांचे प्रकार, वन्यप्राणी आणि वनस्पतींचे एकमेकांशी असलेले संबंध दृक्-श्राव्य माध्यमाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडले. विविध नावीन्यपूर्ण प्रयोगांद्वारे विद्युत चुंबकीय परिवर्तन, न्यूटनचे गतीविषयक नियम आदी भौतिकशास्त्राच्या संज्ञा विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.त्यानंतर पुण्यातील माधव खरे यांनी विमानामागचे विज्ञान प्रात्यक्षिकांसह दाखविले. उडता येत नसले तरी मानवाला उडणाऱ्या पक्ष्यांविषयी कायम कुतूहल वाटत आले. त्यातूनच प्रयत्नपूर्वक विमान हे उडणारे वाहन त्याने विकसित केले. या वेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी विमान तयार केले.