X

केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा

भांडूप येथील केंद्रीय महाविद्यालयाच्या जागेत स्थलांतरित करण्याचा  प्रशासनाचा डाव होता

ठाण्यातील हवाई दलाच्या जागेत आजपासून वर्ग

इमारत धोकादायक ठरवण्यात आल्यानंतर २३ ऑगस्टपासून बंद असलेले कोलशेत येथील केंद्रीय विद्यालय अखेर मंगळवार, ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. याबाबत पालकांनी आवाज उठवल्यानंतर ठाण्यातील हवाई दलाच्या जागेत पहिली ते पाचवीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षणाविना सुरू असलेली परवड आता संपणार आहे.

कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने २३ ऑगस्टपासून येथील पहिली ते बारावीच्या सुमारे १४०० विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे येथील शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. येथील विद्यालय भांडूप येथील केंद्रीय महाविद्यालयाच्या जागेत स्थलांतरित करण्याचा  प्रशासनाचा डाव होता. मात्र, आपल्या लहान मुलांना इतक्या लांब पाठवणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यानंतर शाळा प्रशासनाने ११ वी आणि १२ वी तसेच सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानातील शेडमध्ये शिकविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तरीही पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित होता. अखेर ३ ऑक्टोबरपासून केंद्रीय महाविद्यालयाने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचीही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हवाई दलाच्या जागेत हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. ‘३ ऑक्टोबरपासून केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणार आहे,’ असे महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर सिंग यांनी सांगितले.

दरम्यान इयत्ता तिसरीची एक तुकडी सकाळच्या सत्रात आणि इतर दोन तुकडय़ा दुपारच्या सत्रात भरविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. एक महिन्याहून अधिक काळ शाळा बंद असल्याने मुलांचा खूप अभ्यास बुडाला आहे. त्यामुळे सहामाही परीक्षेचे काय, मुलांना दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • Tags: central school,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain