घोडबंदरमधील नामांकित शाळेत साचणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

ठाणे : नवे ठाणे अशी ओळख मिरवणाऱ्या घोडबंदर भागात पावसाळय़ात पाणी साचण्याच्या प्रकारामुळे येथील पायाभूत सुविधांच्या नियोजनातील त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. पाणी साचण्याचा मोठा फटका या परिसरातील शाळांनाही बसत असून कावेसर येथील न्यू होरायझन शाळेभोवती मुसळधार पावसाचे पाणी दुसऱ्या दिवशीही ओसरत नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळय़ात वारंवार सुट्टय़ा द्याव्या लागत आहेत.

मुसळधार पावसात जुन्या ठाण्याचा परिसर जलमय होत असतानाच घोडबंदरसारख्या नियोजित परिसरातही पूरसदृश्य स्थिती निर्माण होत असल्याचे गेल्या दोन वर्षांत आढळून आले आहे. ठाणे शहरात पाणी साचणाऱ्या १३ ठिकाणांची यादी पालिकेने जाहीर केली असून यात घोडबंदरमधील दोन ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, या दोन ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणेही पावसाळ्यात जलमय होत आहेत.  येथील कावेसर भागात असणाऱ्या न्यू होरायझन शाळेत तर पावसाचे पाणी गुडघाभर उंचीपर्यंत साचते. शाळेचा अंतर्गत परिसर सखल असल्याने बाहेरील पाणीही आवारात येऊन जमा होते. अशा वेळी शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करते. मात्र, दुसऱ्या दिवशी पाऊस ओसरल्यानंतरही शाळेत साचलेले पाणी ओसरत नाही. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना सलग दोन दिवस सुट्टी द्यावी लागते.

शाळेचा बाहेर एक मोठा नाला आहे. या नाल्यात मोठय़ा प्रमाणावर कचरा साठलेला असतो. तसेच नाल्याजवळ असणाऱ्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा हा या नाल्यात पडतो आणि नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून राहतो. त्यामुळे पावसाळ्यात नाला भरल्यावर नाल्यातील पाणी शाळेच्या आत येते. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात हे घडते. साचलेले पाणी काढण्यासाठी शाळेत पंपिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच सखल भागाची उंचीही वाढवण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही पाणी साचण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

पावसाळय़ात द्याव्या लागणाऱ्या सुट्टय़ांमुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची भीती असते. अनेकदा शाळा व्यवस्थापन सुट्टीचा दिवस शनिवारच्या, आठवडा सुट्टीतून भरून काढते. मात्र, यामुळे आठवडय़ातील सुट्टीचे कौटुंबिक नियोजन कोलमडते.

– एक पालक.

शाळेच्या बाहेरून मोठय़ा प्रमाणावर आत पाणी येते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सुट्टय़ा जाहीर करतो. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमचे शाळा प्रशासन म्हणून प्रथम कर्तव्य आहे. शाळेत पाणी साचू नये याकरिताच्या सर्व उपाययोजना आम्ही हाती घेतल्या आहेत.

-डॉ.ज्योती नायर, मुख्याध्यापिका, न्यू होरायझन शाळा