पुढील वर्षी होऊ घातलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांना सहभागी होता यावे यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून शहरातील सर्व प्रमुख महाविद्यालयांमध्ये मतदान नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे तरुण एक जानेवारी २०१७ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणार आहेत अशा सर्वाचे नाव मतदान यादीत समाविष्ट व्हावे असा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी या युवकांना महाविद्यालयातच नाव नोंदणी करता यावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांना दिली.

नागरिकांनी आणि तरुणांनी मोठय़ा प्रमाणात मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषत: तरुणांनी मोठय़ा प्रमाणात मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असून त्यासाठी प्रत्येक महाविद्यलयामध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

ठाणे महापालिकेची यंदाची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून सद्य:स्थितीतील चार प्रभागांचा एक प्रभाग या माध्यमातून तयार होणार आहे. प्रभागांची रचना तसेच आरक्षणाची सोडत येत्या सात ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे.

मिशन महाविद्यालय

ठाणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक महाविद्यालात जाऊन पथनाटय़ाचे आणि परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाकूर महाविद्यालय आणि ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामधील तरुणांशी संवाद साधण्यात आला आहे. त्याशिवाय जाहिरात फलक, बस पॅनेल, बस स्टॉप, सोशल मीडिया, बँक एटीएम, मॉल्स, सर्व महाविद्यालये या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या नावनोंदणी अभियानात ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत किंवा जे तरुण १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणार आहेत त्यांना सहभागी होता येणार आहे. महाविद्यालयीन तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविता यावे यासाठी महाविद्यालयांमध्येच नाव नोंदणी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्येही मतदार नोंदणी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.