ठाणे जिल्ह्य़ात दोन उपकेंद्रे उभारूनही विद्यापीठाच्या कारभाराचे विकेंद्रीकरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांसाठी अजूनही मुंबईला फेऱ्या माराव्या लागत आहेत. शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून ठाणेकर विद्यार्थ्यांना उपकेंद्रांद्वारे चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, इतकीच ठाणेकरांची किमान अपेक्षा आहे..
अंबरनाथमधील अनुपम करमरकर हा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी एक विषय गेल्याचा निकाल हाती आल्यानंतर अस्वस्थ झाला. उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहिलेली असल्याने त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्याबाबत पूर्ण आत्मविश्वास होता. मात्र निकाल अनुत्तीर्ण आल्याने त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठ गाठून पुनर्तपासणीसाठी अर्ज भरला. मात्र पुनर्तपासणीचा निकाल मिळण्यासाठी निकालानंतर तब्बल सहा महिने वाट पाहावी लागली. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या. प्रत्येक वेळी तेथील कर्मचाऱ्यांशी विनंती करण्यापासून सुरू झालेला संवाद आरडाओरडय़ापर्यंत पोहोचत होता. मात्र निकाल मात्र मिळत नव्हता. अशाच काहीशा अनुभवातून कल्याणच्या पराग विशे या तरुणालाही जावे लागले. ‘विद्यापीठाचे काम आणि सहा-सात महिने थांब’ अशीच अवस्था या मुलांना सहन करावी लागत आहे. सहा महिने उशिरा मिळालेल्या गुणपत्रिकांमुळे या तरुणांचे सहा महिने तर वाया गेलेच, शिवाय नोकरीसाठी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्याला जणू काही तो अनुत्तीर्णच झालाय, या नजरेने पाहत होते. विद्यापीठाच्या अशाच कारभाराचा फटका दररोज शेकडो विद्यार्थ्यांना बसतो. कल्याणच्या स्वप्निल काणे या विद्यार्थ्यांने बीएसाठी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ विभागातून प्रवेश घेतला. मात्र त्याची पुस्तके आणि अभ्यासाचे साहित्य परीक्षा संपली तरी त्याला मिळाले नाही. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या सगळ्याचा सामना करावा लागत असून ठाणे आणि कल्याण शहरांतील विद्यापीठाची उपकेंद्रे अधिक सक्षम असती तर विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली नसती, असे येथील शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई विद्यापीठाचे ठाणे आणि कल्याण शहरात उभे राहणारे उपकेंद्र म्हणजे विद्यापीठाचे शहरातील स्वतंत्र कॅम्पस असेल. व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, सोशल सायन्ससारख्या उच्चशिक्षणाच्या अनेक संधी इथे उपलब्ध होतील. त्यामुळे उपकेंद्रे शहरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये महत्त्वाचे योगदान देतील. ठाणे आणि कल्याण शहरामध्ये उभारण्यात आलेल्या विद्यापीठ उपकेंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यात आणि भूमी हस्तांतरणाच्या कार्यक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठाकडून अशी अनेक आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. शहरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा मिळतील, या हेतूने महापालिकेने कवडीमोल भावाने उपकेंद्रासाठी भूखंड उपलब्ध करून दिले. मात्र विद्यार्थ्यांच्या पदरात फारसे काही पडले नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. त्यामुळे ठाणे आणि पलीकडच्या शहरातील हजारो मुलांना आजही मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. विद्यापीठातही एका खेपेत काम होत नाही. अनेकदा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे त्यांना खूप मनस्ताप सोसावा लागतो. या अन्यायाविरुद्ध कुणीही दाद घेत नाही. लोकप्रतिनिधीही या बाबतीत उदासीन असल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडावेत, अशी त्यांनी अपेक्षा आहे. खरे तर उपकेंद्राच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुरती निराशा होऊ लागली आहे.
अडचणीचे ठाणे उपकेंद्र..
ठाणे-भिवंडी रस्त्यावरील बाळकुम भागामध्ये ठाणे महापालिकेने विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी २६ हजार चौरस मीटरपेक्षाही जास्त जागा अवघे एक रुपया नाममात्र शुल्क आकारून दिली. १७ ऑगस्ट २०१० रोजी या उपकेंद्राचे भूमिपूजन झाले आणि बांधकामाला सुरुवात झाली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक सुविधांसह विद्यापीठाची इमारत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी सज्ज होईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. मुंबई विद्यापीठाचे हे उपकेंद्र विद्यापीठापासून पूर्णपणे स्वतंत्रच राहिले. विद्यापीठ आणि उपकेंद्रामध्ये कोणताही समन्वय नाही. त्यामुळे या उपकेंद्राचा फायदा पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकला नाही. केवळ बीएमएस, बीएमएम, बीबीए आणि एलएलबी हे चार अभ्यासक्रम जेमतेम सुरू करून विद्यापीठाने उपकेंद्र जेमतेम सुरू ठेवले. केवळ अभ्यासक्रमच नव्हे तर बऱ्याच प्रमाणात पायाभूत सुविधांचाही उपकेंद्रांमध्ये अभाव आहे. उपकेंद्राच्या एका बाजूला असलेल्या म्हशीच्या तबेल्याचा कचरा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच टाकला जात आहे, तर दुसरीकडे अतिक्रमणेही वाढू लागली आहेत. कारण उपकेंद्र इमारतीला संरक्षक भिंत नाही. त्याचप्रमाणे येथे पुरेसे सुरक्षारक्षकही नाहीत. परिणामी येथे अनेक गैरप्रकार घडू लागले आहेत. शहरातील अनेक विद्यार्थ्यांना या उपकेंद्राची माहितीही नाही. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याही तुरळक असते. ठाणे स्थानकातून विद्यापीठ उपकेंद्राकडे जाण्यासाठी बस नसल्याने रिक्षांशिवाय पर्याय नाही.
कल्याण उपकेंद्राचीही प्रतीक्षाच..
कल्याणच्या गांधारी परिसरातील १० एकर जागा महापालिकेने विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रासाठी दिल्यानंतर १४ एप्रिल २०१० रोजी या केंद्राच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. ठाणे उपकेंद्राच्या आधी भूमिपूजन झालेल्या या केंद्राचे बांधकाम सुरू होण्यासाठी मात्र अडचणी निर्माण होत गेल्या. त्यामुळे ठाणे उपकेंद्रात अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी कल्याण उपकेंद्र मात्र अद्याप अपूर्ण अवस्थेमध्येच आहे. हे काम होण्याची गती लक्षात घेता ३० जून ही विद्यापीठाने दिलेली डेडलाइनसुद्धा पूर्ण करणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शैक्षणिक उपक्रम सुरू होण्याची अपेक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाही निराशेचा सामना करावा लागणार आहे. त्यातून यंदा हे केंद्र सुरू झालेच तरी त्याची अवस्था ठाण्याप्रमाणेच अधांतरी राहण्याची शक्यता अधिक आहेत. त्यामुळे कल्याण उपकेंद्राकडूनही विद्यार्थ्यांचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे.

शिक्षणासाठी शहराबाहेरचा प्रवास थांबवा..
शहरामध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत नसल्यानेच विद्यार्थी इतर शहरांकडे धाव घेत आहेत. अगदी कला शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरीही शहरातील आपल्या जवळच्या महाविद्यालयाऐवजी मुंबईतील नामांकित महाविद्यालयाचा पर्याय निवडू लागले आहेत. ठाणे शहरात तुलनेने अगदी कमी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना कर्जत, कसारा, भिवपुरी, शेलू यांसारख्या ठिकाणी उभारण्यात आलेली महाविद्यालये गाठावी लागत आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये अशा प्रकारच्या चांगल्या शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळेच शहराबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मुंबई विद्यापीठाने शहरातील उपकेंद्रांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे त्यासाठीच आवश्यक आहे.
श्रीकांत सावंत