लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : शाळांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दाखल्यांसाठी तहसील कार्यालयामध्ये होणारी विद्यर्थी व पालकांची गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना आखली आहे. विद्यर्थ्यांनी सामान्य सेवा केंद्रामध्ये (सीएसई) दाखले मिळण्याकरिता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर हे दाखले संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यर्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच इतर प्रमाणपत्रांची गरज भासते. अशा वेळी त्यांचे अर्ज ई- सेवा केंद्रांमध्ये करून हे दाखले दिले जात असत. दाखल्यांसाठी अर्ज भरण्याकामी तसेच ते मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांना अनेकदा यावे लागत असल्याने तसेच केंद्राच्या बाहेर गर्दी होत असते. करोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर हे धोकादायक ठरण्याची शक्यता पाहता सामान्य सेवा केंद्रातून विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

करोना संक्रमणाचा प्रादुर्भाव जाणवणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करणे तसेच सामुदायिक प्रसार होणे टाळण्यासाठी एखाद्या गावांमध्ये मर्यादित काळासाठी कठोर टाळेबंदी लावण्याचे निर्णय आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीवरून घेतले जातात. एखाद्या परिसरात वाढणारी रुग्णसंख्या हीच टाळेबंदी लादण्याचा निकष असून नागरिकांनी केलेली मागणी किंवा त्यासंबंधी केलेल्या विरोधावर हा निर्णय अवलंबून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृती दलाची उभारणी

राज्य शासनाने निर्माण केलेल्या विशेष कृती दलाप्रमाणे जिल्ह्यात दोन कृती दल उभारण्यात आले असून औषधोपचार व संबंधित खरेदी करण्यासाठी असलेल्या कृती दलाचे नेतृत्व शल्य चिकित्सक करत आहेत. त्याचप्रमाणे उपचार केंद्राची तपासणी आणि निर्मिती करण्यासाठी असलेला कृती दल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून या दोन्ही कृती दलामार्फत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.