ज्येष्ठ ग्रंथकार प्रा. शेषराव मोरे यांना ‘स्वा. सावरकर’ पुरस्कार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हिंदुत्व आणि संस्कृतीविषयक विचार समजून घ्यायचे असतील तर प्रथम इस्लामचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सावरकरांचा बुद्धिवाद समजून घेतल्याशिवाय त्यांचे हिंदुत्व काय आहे हे समजत नाही. सावरकर हे खरे निधर्मीवादी, कठोर बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. हाच विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रंथकार प्रा. शेषराव मोरे यांनी सोमवारी येथे केले.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्रा. मोरे यांना स्वा. सावरकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला टिळकनगर संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद पटवारी, नि. द. शेंबेकर, आशीर्वाद बोंद्रे, महेश ठाकूर, माजी मुख्याध्यापिका सविता टांकसाळे उपस्थित होते.
सावरकरांचा विचार समजून न घेता त्यांच्या साहित्यामधून आपल्या मनाचे अर्थ काढून पुरोगामी, डाव्यांनी त्यांना नेहमीच टीकेचे लक्ष्य केले. कोणत्याही वैचारिक कसोटीवर न टिकणारे लिखाण या पुरोगाम्यांनी सावरकरांवर करून अनेक वर्षे त्यांच्या विचाराची बदनामी केली आहे. या पुरोगाम्यांचे विचार, त्यांचे साहित्य विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अभ्यासाला असल्याने सावरकरांच्या विचाराविषयी चुकीचा संदेश तरुण पिढीत जात आहे. सावकरांवर टीका करणाऱ्या पुस्तक, ग्रंथांना पुरस्कारही मिळत असल्याने त्या चुकीच्या विचाराला एक प्रकारे मान्यता मिळत आहे. पुरोगाम्यांच्या या विचारांना आपण सडेतोड उत्तरे देत आहेत. पण त्याचा काहीही फायदा होत नाही, अशी खंत प्रा. मोरे यांनी व्यक्त
केली.
सावरकरांनी कधीच भारतीय संस्कृतीमधील वेद, पुराणे, शास्त्र यांचा गौरव किंवा त्याचे अनुकरण करा म्हणून पुढाकार घेतला नाही. याउलट ही सगळी वेद, पुराणे हजारो वर्षांपूर्वीची असल्याने ती आता कालबाह्य़ झाली आहेत. ती फेकून देण्याच्या पात्रतेची आहेत. हा जुनाट विचार आताच्या नवीन पिढीला लागू होणार नाही, असे विचार वेळोवेळी सावरकरांनी मांडले आहेत. याउलट वेदच विज्ञान झाले पाहिजे यासाठी त्यांची धडपड होती, असे प्रा. मोरे यांनी स्पष्ट केले. सव्वा तासाच्या भाषणात प्रा. मोरे यांनी सावरकर विचारांतील विविध कंगोरे उघड केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक आभाळे यांनी केले.