डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर या परिसरातील सर्वच केमिकल कंपन्या इतरत्र हलविण्यासाठी लवकरच धोरण आखण्यात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्वच केमिकल कंपन्यांमधील उत्पादन तातडीने थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना प्रत्येक कंपनीत जाऊन पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सुभाष देसाई यांनी गुरुवारी दुपारी डोंबिवलीतील घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संदर्भात नव्याने धोरण आखण्यात येईल, असे सांगितले.
डोंबिवली एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांजवळ आता रहिवासी वस्ती वाढली आहे. त्यामुळे येथील केमिकल कंपन्या इतरत्र हलविण्यावर धोरण आखावे लागणार आहे. लवकरच हे धोरण आखून येथील कंपन्या इतरत्र हलविण्यात येतील. त्याचबरोबर आज घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल. जर यामध्ये एमआयडीसीचे अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे सुभाष देसाई म्हणाले.