डोंबिवलीतील ‘द साऊथ इिडयन’ महाविद्यालयाच्या महिला विभागाने आयोजित केलेली दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. ‘गतीमान समाजातील महिलांसमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयावर आधारीत असलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. क्रांती जेजुरकर आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या उपसचिव आर. विमला उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. संपूर्ण देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी या परिषदेमध्ये आपली उपस्थिती नोंदवली होती. दै. लोकसत्ता या परिषदेचा माध्यम प्रायोजक होता.
वकील, प्रशिक्षक, प्रशासकिय, कॉर्पोरेट, माध्यम, उद्योग, सामाजिक क्षेत्र या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांची परिषद जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये द साऊथ इंडिया महाविद्यालयात पार पडली. उद्घाटन सत्रामध्ये राज्याच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या उप सचिव आर. विमला उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी महिलांशी संवाद साधला. समाजामध्ये वावरत असताना महिलांसमोर पावलो पावली नवी आव्हाने उभी असतात. या आव्हानांना तोंड देत असतानाच रोजगाराची चांगली संधीही निर्माण होत असते. याचे विस्तृत विवेचन या वेळी विमला यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध प्रांतातून महिला सहभागी झाल्या होत्या. गुजरात, अहमदाबाद, दिल्ली, नॉयडा यासारख्या परराज्यातूनही महिलांनी यात सहभाग नोंदवला होता. दोन दिवसांमध्ये महिलांनी
आपल्या विषयाच्या संशोधन प्रबंधांचे विवेचन केले.
पहिल्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या कायदे शाखेच्या विभागातील सहाय्यक प्रा. डॉ. रश्मी ओझा समाजातील महिलांच्या असमानतेला कायद्याच्या माध्यमातून मिळणारी मदत विषद केली. मुलुंड कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्या तर डॉ. पार्वती व्यंकटेश यांनी यावेळी महिलांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रभाव पुढील पिढीला ऊर्जा देणारा ठरत आहे, असे निरीक्षण नोंदविले. तसेच मोठय़ा संख्येने अशा प्रशिक्षीत महिला प्रशासनात येत असल्याने प्रश्न संवेदनशीलतेने सोडविले जात आहेत, असेही त्या म्हणाल्या.

मान्यवर महिलांचे विवेचन
या कार्यक्रमामध्ये आयएमसीचे संचालक राधाकृष्ण बजाज, प्रा. माया देसाई, आदर्श महाविद्यालय बदलापूरच्या प्राचार्या डॉ. वैद्यही दप्तरदार, युओएम कायदा शाखेच्या सहाय्यक प्रा. डॉ. स्वाती सिंग, एसआयईएस महाविद्यालय सायनच्या प्रा. डॉ. शांती सुरेश यांनी पहिल्या दिवशी प्रबंध वाचनातून महिलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी वाचा ट्रस्ट मुंबईच्या वरिष्ठ प्रकल्प समन्वयक मेधाविनी नामजोशी,
मिठीबाई महाविद्यालयाचे प्रा. महेश भागवत, प्राचार्या पद्मजा अरविंद आणि एजीएनआयच्या समन्वयक राजकुमार शर्मा यांनी यावेळी विस्तृत विवेचन या परिषदेमध्ये केले.