बदलापूरमधील तरुण शेतकऱ्याची किमया

पारंपरिक पद्धतीला नावीन्याची जोड दिली तर शेती व्यवसाय अजूनही उत्तमच असल्याचे बदलापूर येथील एका तरुणाने दाखवून दिले आहे. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावाजवळील पाषाणे गावात अनुभव मांजरेकरने ब्रोकोली, लेटय़ूस आणि नवलकोल या भाज्यांची यशस्वी लागवड केली आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्यपणे अशा भाज्या पिकवण्यासाठी हरितगृहाची उभारणी व तापमान नियंत्रण आवश्यक असते; परंतु अनुभवने दोन एकर शेती भाडय़ाने घेऊन त्यात हरितगृहाशिवाय या भाज्यांचे यशस्वी उत्पादन करून दाखवले आहे. सध्या या शेतातून दररोज २०-२५ टोपल्या भाजीपाला मुंबईत पोहोचवला जात आहे.

मिश्र पीक पद्धतीचा वापर करून दोन एकर जागेत अनुभवने एकाच कुळातील ब्रोकोली, लेटय़ूस आणि नवलकोलची लागवड केली आहे. या भाज्या साधारणपणे थंड हवामानात अथवा शीतगृहात नियंत्रित तापमानात घेतल्या जातात. मात्र अनुभवने अशी कोणतीही व्यवस्था न करता उघडय़ा शेतातच या विदेशी पिकांची लागवड केली. त्याला ठिबक पद्धतीने नियमित पाणी दिले. तिन्ही पिके एकाच कुळातील असल्याने त्यांना एकाच प्रकारची खते आणि कीटकनाशके लागतात. मिश्र पीक पद्धतीचा फायदा असा की, एका भाजीचा भाव कमी झाला तरी अन्य दोन प्रकारच्या पिकांमधून बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात.

या तिन्ही भाज्यांची लागवड ८ फेब्रुवारीला केली गेली. साधारण ६५ ते ७० दिवसांत पीक हाती येऊ लागते. त्यानुसार आता एप्रिल महिन्यात या विदेशी भाज्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. बाजारात साधारणत: ५० ते ८५ किलो दराने या भाज्या विकल्या जातात. एका हंगामात सर्व खर्च वजा जाऊन एकरी किमान साठ हजार रुपये नफा मिळू शकतो, असे अनुभवने सांगितले.

सेंद्रिय केळ्यांचीही लागवड

अनुभव मांजरेकर याने विदेशी भाज्यांप्रमाणेच बारवी धरण परिसरातील चांदप गावी केळ्यांची लागवड केली आहे. त्यातही त्यांना चांगले यश मिळाले आहे. जुलै महिन्यात केळ्यांची रोपे लावली होती. आता केळ्यांचे घड लागले आहेत. येत्या जून महिन्यात केळ्यांचे उत्पादन मिळू शकणार आहे. व्यापाऱ्यांनी जागेवर १२ रुपये किलो दराने ही केळी खरेदी करण्याची तयारी दाखवली असल्याचे अनुभवने सांगितले.

या तिन्ही भाज्यांना हॉटेलांमध्ये मोठी मागणी आहे. सध्या दररोज पाच ते सहा विक्रेते शेतावर येऊन भाजीपाला घेऊन जातात. दररोज २० ते २५ टोपल्या (ब्रॅकेटस्) भाजीपाला मुंबईला जात आहे. हरितगृहाशिवाय उत्पादन घेतल्याने उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

अनुभव मांजरेकर, बदलापूर