विरोधात पक्षाने कच्चे उमेदवार दिल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

गुडांना दारे बंद केल्याचा दावा करत बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चव्हाण यांना उमेदवारी नाकारणाऱ्या भाजप नेत्यांनी शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर परिसरातून कच्चे उमेदवार पुढे करत चव्हाण यांनाच मदत होईल, अशी खेळी खेळल्याचा आरोप या भागातील भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

संघटनात्मक पातळीवर शिवसेनेपेक्षा कमकुवत असलेल्या भाजपने शिवाईनगर परिसरातील वादग्रस्त नेते सुधाकर चव्हाण यांना पक्षात हिरवा गालिचा अंथरण्याची तयारी सुरू केली होती. शिवाईनगर, सिद्धांचल या परिसरात चव्हाण यांचा राजकीय दबदबा असल्याने त्या भागात शिवसेनेसोबत टक्कर घेण्यासाठी चव्हाण यांचा उपयोग होऊ शकतो असा दावा करत भाजपमधील काही नेते त्यांच्या प्रवेशासाठी आग्रही होते.मात्र, बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले चव्हाण यांना प्रवेश दिल्यास शहरातील हक्काच्या मतदारांवर परिणाम होऊ शकेल, असा दावा करत आमदार संजय केळकर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या प्रवेशाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. काही कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना संदेश धाडले होते. त्यामुळे चव्हाण यांच्या प्रवेशावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी फुली मारल्याची चर्चा होती.

एकीकडे चव्हाण यांना प्रवेश नाकारत कलंकित नेत्यांना पक्षाबाहेर ठेवले जात असल्याचे चित्र रंगविले जात असले, तरी दुसरीकडे मात्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असणाऱ्या शिवाईनगरातून एकाही इच्छुक उमेदवारास भाजपने प्रतिनिधित्व दिले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगरचा परिसर या प्रभागात येतो. भाजपने उमेदवार निवड करताना सनी पवार, डॉ. ताराचंद पवार आणि स्वप्नाली साळवी हे तीन उमेदवार वसंत विहार भागातून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसंत विहार पट्टय़ात १५ हजार मतदार असून या भागात सुधाकर चव्हाण यांचा फारसा प्रभाव नाही. असे असताना वसंत विहार भागातील उमेदवार देऊन तेथील मतांचे शिवसेना-भाजपमध्ये विभाजन झाल्यास चव्हाण यांनाच फायदा करून देण्याचा हा डाव असल्याचा आरोप या भागातील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सीताराम राणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. भाजपने उमेदवारांची निवड करताना चव्हाण यांच्या हिताची रणनीती अवलंबिल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.

यासंबंधी भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्याकडे विचारणा केली असता असे काही झालेले नाही, असे ते म्हणाले. सुधाकर चव्हाण यांना मदत करण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.

चव्हाण प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.