tv11मार्च, एप्रिल हे परीक्षांचे महिने संपले की सर्वच मुलं काही प्रमाणात ‘रिलॅक्स’ होतात. याच काळात विविध प्रकारच्या व्यावसायिक शिबिरांचेही पेव फुटते. ‘व्यक्तिमत्त्व विकास’, ‘छंद वर्ग’, ‘गड किल्ले सफरी’, ‘धमाल मजा’ अशी किती तरी प्रकारची शिबिरे सुटीत असतात. पण ही शिबिरे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयांना परवडणारी. समाजात अतिसामान्य, मागास, वंचितांचा असा एक मोठा गट प्रत्येक गावी असतोच. या गटाच्या वस्तीतील ‘यंग एनर्जी’चे, त्यांच्या सुटीचे काय? ज्यांचे बालपणच हरवलेले असते, शाळा शिकतानाच ज्यांना छोटी-मोठी कामे करावी लागतात, ज्यांच्या घरी शैक्षणिक पाश्र्वभूमी नाही, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नाही, शालेय शिक्षणच ज्यांना प्रतिकूलतेत घ्यावे लागते त्यांना कुठून हौस, छंदवर्ग, सहली, शिबिरे परवडणार?
पण अशा मुलामुलींनाही ‘आम्ही आहोत की तुमच्या पाठीशी,’ असे म्हणणारी आणि त्यांच्यासाठी काम करणारी ‘समता विचार प्रसारक संस्था’ ही संघटना आहे. ठाणे शहरात ही संस्था दोन तपांहून अधिक काळ विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्य करत आहे. वंचित विद्यार्थ्यांसाठी! समाजातील एका विशिष्ट स्तरातील गटाला ‘असंस्कृत’ ठरवून त्यांच्याप्रति नाके मुरडण्यापेक्षा त्यांच्यातूनच एकेक ‘चिरा’ घडवून राष्ट्रीय चारित्र्याचा बुलंद गडकोट निर्माण करणे हे काम वाटते तितके सोपे नाही. पण ते अशक्यही नाही हे या संस्थेने आपल्या कार्यसातत्यातून दाखवले आहे. पैसा, प्रसिद्धी, पद, मानसन्मान यांपैकी कशाचीच असोशी नसणारी माणसे यासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत. संजय मं. गो., लतिका सु. मो., जगदीश खैरालिया, मनीषा जोशी आणि किती तरी.
विद्यार्थ्यांना शिक्षणात थोडासा आधार देणारी ‘एकलव्य’ योजना ते राबवीत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत:च धडपड करायची पण या धडपडीत पडले तर धडपणे उठून पुढे चालता यावे यासाठी आधार! अशाच एकलव्यांसाठी नुकतेच २३वे ‘समता संस्कार निवासी शिबीर’ ठाण्याजवळ येऊर या ठिकाणी घेतले. सुजाता भारती यांनी आपली प्रशस्त जागा या शिबिरासाठी वापरण्यास दिली, तर पांचाळ केटर्सनी पाचही दिवस विद्यार्थ्यांच्या जेवणाखाणाची व्यवस्था केली.
दररोज सकाळी ५.३० वा. शिबिरार्थीचा दिवस सुरू होत असे. व्यायाम, प्रार्थना, सफाई, श्रमदान याबरोबरच समतेची गाणी, डायरी लेखन, रात्रीची प्रार्थना या रोज करावयाच्या गोष्टी होत्या. थोरांची ओळख या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, नरेंद्र दाभोलकर अशा महान व्यक्तींच्या जीवनकार्याचा परिचय रोज करून दिला जाई. ‘मी मुलगा/ मुलगी आहे म्हणून’, ‘माझे घर परिवार-कौटुंबिक अर्थव्यवस्था’, ‘शिबिरानंतर पुढे काय?’ अशा विविध विषयांवर या तरुण विद्यार्थ्यांच्या गटचर्चा घेण्यात आल्या. स्पेशल मीडिया, अक्षय ऊर्जा विवेक, प्रेम आणि आकर्षण, नाटक, कविता, अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन, सद्य:स्थिती व पुढील दिशा, जाणीव जागृतीचे खेळ अशा विविध विषयांवर अनेक मान्यवर तज्ज्ञांनी मुलामुलींशी सुसंवाद साधला.
शंकर गलांडे, जगदीश खैरालिया, सोमनाथ गायकवाड, लीना गुरव, लतिका सु. मो., संजय मं. गो., निखिल चव्हाण, प्रा. कीर्ती आगाशे, प्रशांत केळकर, सुनील पोटे, मीनल उत्तुरकर, हर्षदा बोरकर, वंदना शिंदे, उल्का महाजन, डॉ. शुभा थत्ते, पंकज गुरव असे अनेक मान्यवर विद्यार्थ्यांशी समरस होऊन त्यांच्या विचारांना दिशा देत होते, अगदी सहजपणे, हसत खेळत! या सगळ्यांचा परिपाक म्हणून समारोपाचे वेळी शिबिरार्थीनीच छोटय़ा नाटिका अतिशय सुंदर रीतीने सादर केल्या. विषयांची निवड, लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे सर्व काही त्यांचेच! कोणाच्याही मदतीशिवाय-मार्गदर्शनाशिवाय.
समारोपाचे दिवशी उपस्थित राहण्याचा माझ्या सुदैवाने मला योग आला. ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या गटांना लोटस, झेंडू, जाई, जुई, रेड रोज, सनफ्लॉवर इत्यादी नावे होती. प्रत्येक गटाने छोटय़ा नाटिकेचे सादरीकरण केले. ‘शिक्षणाचा बाजार’, ‘स्त्री-भ्रूणहत्या’, ‘मुलींची छेडछाड’, ‘अन्यायाविरुद्ध लढा’, ‘गुंड हा समाजातला कचरा’,  ‘कचरा वेचा कचरा’, ‘रक्तदान’, ‘किंमत-आईवडिलांची’ असे अनेक विषय त्यात होते. ज्या वास्तवाला तरुण पिढीला भिडायचे आहे त्याची ओळख करून देणारे, सामाजिक जाणीव निर्माण करणारे आणि ताणतणावांचे-भावभावनांचे योग्य व्यवस्थापन कसे करता येईल याचे भान देणारे सादरीकरण होते. कोणत्याही प्रकारची रंगभूषा, वेषभूषा, नेपथ्य, साहित्य, काहीही नसताना लेखनातील विचार सादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहचत होते.
मुले विचार करू शकतात, त्यांच्या ठिकाणी कलागुण आहेत, ऊर्जा आहे याचेच प्रत्यंतर यातून येत होते. पाच दिवसांच्या सहवासातून, कामातून मुलामुलींमध्ये निरामय मैत्री निर्माण होऊ शकते हेही जाणवत होते. मुले यातून बरेच काही शिकली. त्यांनी शिकण्याचा व श्रमदानाचा आनंदही घेतला आणि आता त्यांना ‘शिबिर संपूच नये’ असे वाटत होते.
विशेष म्हणजे ‘एकलव्य’ योजनेतूनच पुढे तयार झालेले काही कार्यकर्ते विद्यार्थीच या शिबिराचे संयोजक, व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. गोरख हिवाळे, विकास सुरवसे, संजय निवंगुणे असे अनेक कार्यकर्ते तयार होत आहेत.
नंदिनी अविनाश बर्वे