उन्हाळी सुट्टीचे एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे या सुट्टीत आयोजित केली जाणारी विविध शिबिरे, कार्यशाळा. विशेषत: शहरी भागातल्या मुलांसाठी अशा प्रकारची शिबिरे म्हणजे पर्वणी असते. या शिबिरात समवयस्क मुलांबरोबर सुट्टीतला फावला वेळ व्यतीत करता येतो, विविध प्रकारच्या कलाकौशल्यांशी तोंडओळख होते आणि सुट्टीचा एक वेगळा आनंद घेता येतो. अशा तऱ्हेचा आनंद समाजातील विशेष मुलांनाही उन्हाळी सुट्टीतल्या कार्यशाळेच्या माध्यमातून घेता यावा, या उद्देशाने ठाण्यातील जागृती पालक संस्थेतर्फे ग्रीष्मोत्सव हे वैशिष्टय़पूर्ण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
जागृती पालक संस्था ही ठाणे शहर परिसरातील मतिमंदत्व असलेल्या पाल्यांच्या पालकांनी एकत्र येऊन (२००२) स्थापन केलेली संस्था आहे. मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांप्रमाणे जागृतीचे उद्दिष्टही मतिमंद असलेल्या व्यक्तींचा विकास आणि पुनर्वसन आहे. जागृती संस्थेतर्फे ग्रीष्मोत्सव शिबिराचे आयोजन करताना हे व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आराखडा तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे या शिबिरात मुलांबरोबर मुलांच्या मातांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. ही विशेष मुले, त्यांचे पालक व कुटुंब हे काहीसे वेगळे पडतात आणि विशेष मुलाला वाढवताना आयुष्यातली आनंद, मजा, खरे तर हसणेही विसरून जातात हे वास्तव आहे. तुम्हा-आम्हाला जसा ब्रेक हवा असतो (आपल्याला तर सतत आणि अगदी सहज मिळत असतो) तसा त्यांनाही हवा असतो आणि अगदी छोटय़ा छोटय़ा आनंदाच्या क्षणापासूनही वंचित राहून संघर्षमय जीवन ते रोजच वर्षांनुवर्षे जगत असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तीन दिवस १० ते ५ वेळेत ग्रीष्मोत्सव हे शिबीर विशेष मुले व त्यांची आई किंवा बहीण यांच्यासाठी आयोजिण्यात आले होते. मुंबईतील एक समाजसेवी संस्था आणि जागृती पालक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानसाधना महाविद्यालय येथे भरलेल्या या शिबिरात प्रवेश विनामूल्य होता. दररोज उद्घाटनाच्या कार्यक्रमाने, दीपप्रज्वलन करून या शिबिराचा प्रारंभ होत होता. शहरातील नामवंत व्यक्तींनी यासाठी आपला अमूल्य वेळ तर दिलाच, पण या मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांचा उत्साह वाढवला.
या विशेष मुलांना त्यांच्या दैनंदिन शाळा किंवा कार्यशाळेतल्या अनुभवांपेक्षा/ कामापेक्षा काही तरी नवीन अनुभव देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या शिबिराद्वारे करण्यात आला. त्यात मुलांना प्रत्यक्ष सामावून घेण्यात आले. याचबरोबर स्त्री-पालकांसाठीही खास कार्यशाळा आयोजिण्यात आल्या होत्या. यामागेही त्यांचे, मुलांचे आणि पर्यायाने कुटुंबाचे जगणे अर्थपूर्ण करण्याची प्रामाणिक कळकळ होती. नवीन कलाकौशल्यांचा अनुभव तज्ज्ञांमार्फत देताना मुले आणि माता किती प्रमाणात आत्मसात करू शकतील, दोघे मिळून छोटय़ा प्रमाणात काही व्यवसाय सुरू करू शकतील का, जेणेकरून त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल आणि मुलांचा हातभार लागला, मुले त्यात गुंतून राहिली तर ती कोणालाही ओझे वाटणार नाहीत.
या मुलांनी पेंटिंगचा अनुभव घेताना पेंटिंगविषयक कार्यशाळेत (शैलेश साळवी) रोलरने रंगवण्याचा, त्यानंतर छोटय़ामोठय़ा ब्रशच्या साहाय्याने रंगांचे आविष्कार कोरोगेटिव्ह बॉक्सेसच्या माध्यमावर साकारले. रंगांच्या या दुनियेत मुले खरेच रंगून गेली, रममाण झाली. या कार्यशाळेतून या मुलांमधली सर्जनशीलता चाचपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जागृतीची मुले आणि माता कागदी पिशव्या तयार करतात आणि त्याला समाजाकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. या पिशव्यांवर ब्लॉक प्रिंटिंग केल्यास त्या आकर्षक दिसतात. आधी मुलांनी कागदावर आणि मग नंतर पिशव्यांवर ठसे मारण्याचे मार्गदर्शन (अनिता धानोरकर) घेतले आणि मग पिशव्यांनाही नवे रूप दिले. स्त्री सभासदांनी कापडावर ब्लॉक प्रिंटिंग करण्याविषयीचे मार्गदर्शन घेतले. भविष्यात आई आणि मुले मिळून आकर्षक कागदी पिशव्या तर स्त्री सभासद साडी/ दुपट्टा याच्यावर ब्लॉक प्रिंटिंग करून देण्याच्या ऑर्डर्स घेऊ शकतात. या महिलांसाठी पॉट पेंटिंगचे मार्गदर्शन (अर्चना जोशी) करणारी कार्यशाळा होती. त्यांनीच मुलांना वॉल पेंटिंग करण्याचा अनुभव देताना पुन्हा एकदा रंगांचा अनुभव दिला. आज जागृतीच्या कार्यालयाच्या दर्शनी भिंतीवर आपण या विशेष मुलांची सर्जनशीलता अनुभवतो आणि सहज ती मुलांनी रंगवलेली भिंत पाहून दादही देतो. मुले आणि आया यांनी कागदी फुले तीही निरनिराळ्या प्रकारची (नीलेश साने सर) तयार करण्याची मजा अनुभवली. दोघांच्या प्रयत्नांमधून सुंदर फुले आणि त्यांचे गुच्छ तयार झाले. पॉट पेंटिंग आणि फुलांची कार्यशाळा यातून तयार झालेल्या आकर्षक फुलदाण्या आलेल्या पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आल्या. सर्वासाठी तो समाधानाचा क्षण होता, पण त्याचबरोबर आपण काही तरी करू शकतो, स्वावलंबी होऊ शकतो हा आत्मविश्वासही निर्माण होत होता. (खरे तर झालाच आहे.)
या महिलांसाठी खास क्विलिंगपासून होणाऱ्या कलाकृतींचे मार्गदर्शन (गिरिजा पिल्लई), मोत्यांच्या दागिन्यांसाठी (शैला खांडगे) यांनी कार्यशाळा घेतली. कलाकुसर आणि स्त्री यांचे जवळचे नाते असते ते येथे अनुभवता आले.
सर्व जणी तहानभूक हरपून दागिने शिकण्यात आणि तयार करण्यात गर्क झाल्या होत्या. वारली पेंटिंगविषयक (भारत नगरकर) मार्गदर्शन हा एक वेगळा अनुभव होता. मग कागदी पिशव्यांवरही वारली कला साकार झाली.
या मुलांना ताल, लय, ठेका याची बहुधा उपजत जाण असते, आवड असते आणि त्याच्याशी ते पटकन जोडले जातात. त्यांना ठेक्याची गाणी आणि त्यावर नाच करायला मनापासून आवडते. त्यासाठी (सुखदा खांडगे) खास नृत्याचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे सत्र दोन दिवस ठेवण्यात आले होते. मुलांनी समारोपाच्या दिवशी खास नृत्य सादर केले. या मुलांच्या मनावरील ताण कमी व्हावा, त्यांना जलद ठेक्यावरील गाणी तबल्याच्या तालावर अनुभवता यावीत, गाता यावीत यासाठी खास सत्र (ऐश्वर्या क्षीरसागर) आयोजिण्यात आले होते. या मुलांना गोष्ट व तीही पशुपक्षी आणि निसर्गातील विविध आवाज ऐकवत गोष्ट अनुभवायला आवडते. अशा गोष्टींचे खास सत्र (नीलेश साने) आणि त्यातील या मुलांचे गुंगून जाणे, खदखदून हसणे हा एक उपस्थितांसाठी संस्मरणीय अनुभव होता.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी