ठाण्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टमधील क्रीडासंकुलातील सभागृह शनिवारी दुपारी उत्साहाने भारले होते. एरवी मुलांची तयारी करून पाठविणारे पालक त्या दिवशी मात्र आपल्याच तयारीत रंगून गेले होते. निमित्त होते वसंतोत्सवाचे. परीक्षा संपून शाळांना सुट्टय़ा लागल्या की, शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस पालकांचा उत्साह व उमेद वाढविण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलागुण हेरण्यासाठी सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या वतीने दर वर्षी वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दर वर्षी या वसंतोत्सवात पालक सहभागी होऊन आपल्या मुलांच्या समोर, शिक्षकांसमोर आपली कला सादर करतात. असा हा पालकांसाठी असलेला वसंतोत्सव हे या शाळेचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल.
प्राथमिक गटातील ही मुले पूर्वप्राथमिक गटात म्हणजे पहिलीच्या वर्गात आपले पहिले पाऊल टाकणार आहे. लहान व मोठय़ा गटात दोन वर्षे शिकणारी मुले जेव्हा पहिलीत गणवेशात प्रवेश करतात, तेव्हा आपली मुले ही लगेचच मोठी झाली याचा प्रत्यय पालकांसोबत शिक्षकही अनुभवतात. या मुलांसोबत पालकांचाही निरोप समारंभ वसंतोत्सवाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतो. प्रत्येक इयत्तेत दर वर्षी येणारी मुले ही जितकी शिक्षकांसाठी नवीन असतात, तितकाच हा वसंतोत्सवही दर वर्षी पालकांसाठी नवीन असतो. यंदाही हा वसंतोत्सव पालकांनी मोठय़ा जल्लोशात साजरा केला. एरवी मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणारे पालक तसेच शाळेच्या कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या पालकांची एकमेकांशी फक्त तोंडओळख असते. तसेच मोबाइलच्या संपर्कामुळे पालकांचे एकत्र येणेही क्वचितच होते, मात्र या कार्यक्रमाच्या तालमीनिमित्त पालकांमध्ये अनोखे मैत्रीचे संबंध निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. एरवी मुलांच्या स्नेहसंमेलनासाठी भाडय़ाने ड्रेस घेण्यासाठी पालकांची गर्दी असते. पण स्वत:साठी ड्रेस खरेदी करण्यासाठी पालकांची धडपडही या निमित्ताने पाहायला मिळाली.
सरस्वती विद्या मंदिर ट्रस्ट ही ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली मराठी माध्यमाची शाळा. याच शाळेतून आज अनेक कलावंत घडले आहेत, तर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत जाऊन शाळेचा नावलौकित वाढवीत आहे. आता लवकरच ही शाळा कात टाकणार आहे. शाळेची नवीन वास्तू साकारण्यात येणार असून, त्यासाठी पालकांना, माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शाळेतील अनेक माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत, शाळेसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आज याच माजी विद्यार्थ्यांची मुलेही याच शाळेत शिकत आहेत हे सांगतानाही पालकांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि अशा पालकांची भेट ही या वसंतोत्सवात झाल्याचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणवले. प्रत्येकालाच आपल्या शाळेचा अभिमान असतो, आणि त्याचमुळे पाल्याच्या निमित्ताने का होईना आपल्या व्यस्त कामातूनही वेळ काढून पालक या वसंतोत्सवात आवर्जून आल्याचे दिसून आले. नुसतेच शालेय शिक्षण न देता विद्यार्थ्यांना अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेचे क्रीडासंकुलही सज्ज आहे. याच संकुलातील मुले आज राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचली आहेत.
वसंतोत्सवाच्या निमित्ताने पालकांना तर व्यासपीठ मिळालेच मात्र त्याही पेक्षा आपली कला सादर करण्यासाठी शाळेने शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन याचा आनंद सर्वच पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कार्यक्रमाची सांगता झाली ती कैरीपन्ह्य़ानी. एकूणच निसर्गातील वसंतोत्सव आपण सगळेच जण अनुभवत असतो. पण या शाळेतील वसंतोत्सवाने पालकांना दिलेली संधी ही प्रत्येक पालकाच्या कायम स्मरणात राहील यात तिळमात्र शंका नाही.
 प्राची