tvlog‘गृहपाठ कधीच पूर्ण करीत नाही. हातातली गोष्ट बाजूला टाकून दुसरेच काही करायला जातो. या मुलाने नुसती लाज आणली आहे. कुठे नेण्याची सोयच नाही. साधे चित्र काढायला गेला तरी अजागळासारखे काम करेल, रंग सांडेल, कागद चुरगळेल. त्याला घेऊन अभ्यासाला बसले तरी याचे लक्षच नसते.’ आमच्याकडे येणाऱ्या पालकांच्या अशा अनेक तक्रारी असतात. आणि हे आहेत अतिचंचल मुलांचे पालक. ही लक्षणे सर्वसाधारणपणे तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून सुरू होतात, पण शाळेत अभ्यास सुरू होण्याच्या सुमारास पालकांना त्याचे गांभीर्य वाटू लागते. कारण त्याचा अध्ययनावर, शिकण्यावर परिणाम होऊ लागतो. जरी बुद्धी चांगली असली तरी लक्ष केंद्रित करण्यात समस्या असल्याने मूल वर्गाच्या मागे राहू लागते. सर्वसामान्य मुलांपेक्षा ही मुले अधिक चंचल असतात. मात्र योग्य चाचण्या आणि उपचारांनी हा चंचलपणा नियंत्रित करता येतो. त्यासाठी योजलेल्या चाचण्या करून निदान झाले तर डॉक्टर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ मिळून त्याला व पालकांना मदत करू शकतात. या मुलांना सांभाळणे, त्यांच्याकडून वयानुरूप क्रिया करून घेणे, त्यांना समाजात मिसळून देऊन त्यांचा उपद्रव होणार नाही हे पाहणे हे मोठे आव्हान, म्हटले तर तारेवरची कसरतच आहे. सहकार्याशिवाय हे काम होणे नाही !
आय.पी.एच.मध्ये आम्ही अशा पालकांसाठी एक मदत गट सुरू केला आहे- त्याचे नाव आहे संतुलन. या मुलांचे पालक या गटामध्ये महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी साडेचार वाजता जमतात व आपल्या पाल्याला संभाळण्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर त्यांनी कल्पकतेने शोधून काढलेले उपाय शेअर करतात. या गटाला मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन असते. डॉक्टर देत असलेली औषधे, त्यामागची भूमिका, अभ्यासातील समस्या इ. अनेक गोष्टींवर चर्चा होते. नव्याने आलेल्या गांगरलेल्या पालकांना दिलासा मिळतो. या चच्रेतून त्यांना एक नवीन दिशाही मिळते. त्यांच्या मुलांपेक्षा २/३ वर्षांनी मोठय़ा असलेल्या मुलांच्या पालकांशी बोलल्याने त्यांना भविष्यातील अडचणींना मार्गही मिळतो.
यातील पहिली पायरी ही की आपले मूल इतरांपेक्षा वेगळे आहे हे स्वीकारणे. ते मूल हे मुद्दाम करत नाही आहे तर हा त्याचाही नाईलाज आहे हे समजून घेणे. तर पुढचा मार्ग आखता येतो. या पालकांपुढे भविष्यातील अनेक प्रश्नही भेडसावतात. निराशेच्या व भीतीच्या सावल्या पछाडतात. ‘संतुलन’चे मार्गदर्शक मानसोपचारतज्ज्ञ आणि इतर सभासद या सर्वातून त्यांना अलगदपणे बाहेर पडायला मदत करतात. यात ‘आपण एकटे नाही’ ही जाणीवही मनाला दिलासा देणारी असते. या गटाच्या मदतीने तुम्ही ‘माझ्या मुलाच्या वह्या नेहमी अपूर्ण असतात, एका वाढदिवसाला गेलो तिथे त्याने भरपूर तमाशा केला. फिशटँकमधले मासे हाताने पकडायला जातो. यापुढे मीही कुठे जाणार नाही व त्यालाही पाठवणार नाही. ‘या व अशासारख्या अनेक समस्यांवर तोडगे काढू शकाल .अशा मुलांना घडवताना पालकांनासुद्धा स्वभावात खूप लवचिकपणा आणावा लागतो.
संपर्क : पन्ना : ९८१९५१९८१५.
ऐश्वर्या : ९८९०४१२००८.