नेत्रालयाबरोबर करारावर स्वाक्षरी; जगप्रसिद्ध आरोग्य व्यवस्थेचा मार्ग प्रशस्त
ठाणेकरांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि आरक्षित भूखंडांचा योग्य वापर करता यावा यासाठी ठाणे पालिकेने शुक्रवारी संकरा नेत्रालय या डोळ्यांच्या उपचारात जगप्रसिद्ध ठरलेल्या रुग्णालयाचा शहरात येण्याचा मार्ग प्रशस्त केला. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि संकरा नेत्रालय संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पद्म्विभूषण डॉ.बद्रीनाथ यांनी शुक्रवारी महापालिका भवन येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यानिमित्ताने महाराष्ट्रात पहिल्यांदाच संकरा नेत्रालयासाठी कवाडे खुली करुन देण्यात आली असून कोलशेत ढोकाळी येथे या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी सुमारे ८४०० चौरस मीटरचा भूखंड एक रुपया नाममात्र दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, पद्मश्री डॉ. नटराजन, डॉ. सहाना वैद्य, डॉ. आशिष वैद्य, श्री. चंद्र परेझ, ग्लॅक्सोचे माजी उपाध्यक्ष सी.जगदीशन आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका आणि संकरा रुग्णालय व्यवस्थापनात झालेल्या करारानुसार कोलशेत-ढोकाळी येथे आरोग्य केंद्र, रुग्णालय तसेच संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ठाण्यासाठी ही महत्त्वपूर्ण घटना असल्याचा उल्लेख आयुक्त जयस्वाल यांनी यावेळी केला. करार सोहळा संपन्न होण्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्री.बद्रीनाथ यांच्याशी या प्रकल्पासंबंधी संवाद साधत महाराष्ट्रात पदार्पण करत असल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या असे जयस्वाल यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

संशोधन केंद्रही कार्यरत होणार
संकरा नेत्रालयाच्या माध्यमातून सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु केले जाणार असून त्याचसोबत संशोधन केंद्रही कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून ४० टक्के वैद्यकिय सेवा गरीबांसाठी पुर्णत: निशुल्क देण्यात येईल. यामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आली असून लवकरच रुग्णालयाचे भूमीपूजन केले जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वर्ग ३ व ४ च्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, महापालिकेच्या डॉक्टर्सना प्रशिक्षण देणे आदी सुविधाही संकरा नेत्रालय व्यवस्थापन उपलब्ध करुन देणार आहे. यावेळी सहा.संचालक नगररचना प्रदीप गोहेल, कार्यकारी अभियंता प्रमोद निंबाळकर आदी उपस्थित होते.