|| प्रसेनजीत इंगळे

नायगाव येथील खदानीतून पाण्याचा भरणा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

विरार : नायगावमधील टिवरी परिसरात असलेल्या खदानीतील दूषित पाण्याचा भरणा टँकरमध्ये केला जात असून हेच पाणी शहरात वितरित होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पावसाळय़ात या खदानीत पाणी साचले आणि ते पिण्यायोग्य नसले तरी अनेक टँकरचालक येथूनच पाणी भरत असल्याचे दिसून आले आहे.

वसई-विरार शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. शेकडो नव्याने उभ्या राहिलेल्या इमारतींना महापालिकेचे पाणी मिळत नसल्याने त्यांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. याच गोष्टीचा फायदा घेत टँकरमाफिया दूषित पाण्याचा भरणा करत असून याबाबत महापालिका प्रशासन अनभिज्ञ आहे.

नायगावमधील टिवरीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी मोठे खदान आहे. या खदानीत सध्या उत्खननाचे काम बंद आहे. पण उत्खनन झालेल्या भागात पावसाचे पाणी साचून भलेमोठे तलाव तयार झाले आहे. या तलावातून दररोज शेकडो टँकर पाणी भरत आहेत. दिवसभर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगा लागत आहेत. याच ठिकाणी टँकरचे चालक अंघोळ करतात, कपडे धुतात तसेच नैसर्गिक विधीही उरकले जातात. जनावरे या पाण्यात बसतात. यामुळे हे पाणी पिण्यालायक नाही आहे. असे असतानाही टँकर माफिया नागरिकांच्या आरोग्याशी खेळत राजरोसपणे टँकर भरून शहरात वितरित करतात.

टँकरमाफिया अशा प्रकारे दूषित पाणी शहरात वितरित करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. टँकरद्वारे शहरात मोठय़ा प्रमाणात पिण्याअयोग्य पाणी वितरित केले जात असतानाही याच्यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही आहे. यामुळे प्रशासनाने या टँकरमाफियांना लगाम घालावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

या ठिकाणांहून टँकरद्वारे जे पाणी भरले जात आहे, ते बांधकामांसाठी वापरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसे नसल्यास तातडीने कारवाई करून हे टँकर बंद करू. – वसंत मुकणे, प्रभारी साहाय्यक आयुक्त, आरोग्य

 

या ठिकाणी तातडीने कर्मचारी पाठवून पाहणी केली जाईल. असे काही आढळून आल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. -किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

 

टँकरमाफिया संपूर्ण तालुक्यात अशाच प्रकारे पाणीपुरवठा करत आहेत. विचारणा केल्यास हे पाणी बांधकामासाठी वापरले जाते, असे सांगितले जाते. पण हेच पाणी वसई-विरारमधील गृहसंकुलांना दिले जाते. या संदर्भात स्थानिक प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही. यामुळे टँकरमाफिया निर्धास्त झाले आहेत. -धर्मेश मीना, स्थानिक नागरिक