२११ खासगी रुग्णालयांना २९०० इंजेक्शनचे वाटप

ठाणे : करोना रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली असून या यंत्रणेमार्फतच जिल्ह्य़ातील खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. या यंत्रणेने गुरुवारी जिल्ह्य़ातील २११ खासगी रुग्णालयांना २९०० रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला आहे. त्यामुळे येथे उपचार घेत असलेल्या अत्यवस्थ रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

करोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपयुक्त ठरत असून यामुळेच या इंजेक्शनची मागणी गेल्या काही महिन्यांपासून वाढली आहे. या औषधांच्या शोधात रुग्णाचे नातेवाईक शहरभर फिरत असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी होते. इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू होते. यातूनच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला होता. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती. या यंत्रणेमार्फत गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येत आहे. अशाचप्रकारे गुरुवारी जिल्ह्य़ातील २११ खासगी रुग्णालयांना एकूण २ हजार ९०० इंजेक्शनचा पुरवठा जिल्हा यंत्रणेने केला आहे. सर्वाधिक म्हणजेच ९०८ इंजेक्शनचा पुरवठा कल्याण-डोंबिवली शहराला करण्यात आला आहे. तर, त्या खालोखाल नवी मुंबई शहराला ६०४ आणि ठाणे शहराला ५६९ इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा आकडेवारी

शहर                     रुग्ण संख्या     रेमडेसिविर पुरवठा

ठाणे शहर                     ११८४          ५६९

नवी मुंबई                     १२६२           ६०४

कल्याण-डोंबिवली            १८९०         ९०५

मीरा-भाईंदर                   ५४०           २६०

भिवंडी                          ३२३             १५४

उल्हासनगर                    ३४०            १६४

अंबरनाथ                        १६९            ८१

बदलापूर                        १०१              ४८

ठाणे ग्रामीण                  २३८             ११५

एकूण                         ६०४७              २९००