अड्डय़ांवर कारवाई नाहीच; रहिवासी हैराण

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर डोंबिवलीतील सागावमध्ये राजरोस दिवसाढवळ्या गावठी दारूची विक्री सुरूच आहे. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरही एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही. त्यामुळे दारू विक्रीला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा सुरू आहे.

येथील चार दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांनी देसई, हेदुटणे, मलंगपट्टी भागातून मोठय़ा प्रमाणात दारूचा साठा करून ठेवला आहे. रहिवाशांनी उत्पादन शुल्क अधिकारी अनिल पवार यांना सागाव भागात कोठे गावठी दारूचे अड्डे सुरू आहेत, याची माहिती दिली आहे. मानपाडा पोलिसांनी या अड्डय़ांची माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे सांगितले होते, मात्र काहीही कारवाई झालेली नाही.

या भागातील एक धंदा डोंबिवलीतील एका नगरसेवकाच्या मेहुण्याचा आहे. बंगल्यातील ओटीचा भाग ग्राहकांना बसण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

रात्री एक वाजल्यानंतर काही राजकीय पक्षांचे झेंडे असलेली वाहने दारू खरेदीसाठी सागावमधील दारू अड्डय़ांवर येतात. घाऊक पद्धतीने दारू खरेदी करून घेऊन जातात. प्रचारातील कार्यकर्ते दिवसभर विविध भागांत फिरतात. त्यांचा थकवा जाण्यासाठी हा जालीम उपाय आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी गावठी दारूचा मोठा साठा चार अड्डे चालकांनी केला होता. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भात वृत्त देताच कारवाई करून हे अड्डे उद्धवस्त केले होते. आता कारवाईसाठी चालढकल का केली जाते, असा प्रश्न सागाव मधील रहिवासी करीत आहेत.

कल्याण पूर्वेत कारवाई

कल्याण पूर्वेत गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून गावठी दारू जप्त केली. एका रहिवाशाने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे कळते. निवडणूक काळात चढय़ा भावाने गावठी दारू विकली तरी त्याचा जाब कोणी विचारत नाही, त्यामुळे दारू विक्रेते या काळात सर्वाधिक साठा करून वर्षभराची कमाई निवडणूक काळात करीत असल्याचे समजते.