भ्रष्टाचाऱ्यांवर बोट ठेवतानाच चुकांचीही कबुली
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्रही या आरोपपत्रात समाविष्ट आहे. या पत्रात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या पत्रात परमार यांनी चार नगरसेवकांवर बोट ठेवतानाच स्वत:च्या चुकाही नमूद केल्या आहेत. तसेच आपल्या चुकांमुळे कंपनी आणि कुटुंबियांचे भवितव्य उद्ध्वस्त झाल्याची खंतही त्यात व्यक्त आहे.
परमार यांचे सुमारे २० पानांचे हे पत्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले होते. त्यात सरकारची चुकीची धोरणे, महापालिका अधिकाऱ्यांची मनमानी, नगरसेवकांनी दिलेला त्रास नमूद होता. या नगरसेवकांची नावे खोडली होती मात्र ती प्रयोगशाळेतून उघड झाली होती. त्याच आधारे पोलिसांनी राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण या चार नगरसेवकांना अटक केली होती.
परमार यांच्या या पत्रामध्ये सरकार, राजकारणी, कुटुंब, मुले, पत्नी, भागीदार, भाऊ, मित्रमंडळी आणि कॉसमास प्रकल्पातील ग्राहक अशा आठजणांना उद्देशून परमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच चार नगरसेवकांवर बोट ठेवतानाच गेल्या दोन-तीन वर्षांत स्व:त केलेल्या व्यावसायिक चुकांचाही उल्लेख केला आहे.
भिवंडी, पुणे आणि काव्या प्रकल्पासाठी वादग्रस्त जमिनी खरेदी केल्या. भागीदारांच्या ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’चाही गैरवापर केला. योगी प्रकल्पातली गुंतवणूक चुकीची ठरली. भागीदारांनी आणि कुटुंबाने विश्वास दाखविला असतानाही कंपनीचा कारभार सांभाळू शकलो नाही. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर प्रचंड दबावाखाली असल्यामुळे तपशील दिला पण, तो द्यायला नको होता, असे सांगत परमार यांनी भागीदारांची माफी मागितली
आहे.
म्हणून स्वत:ला संपविले..
तुमचे वडील ‘चीटर’ नव्हते, असे मुलांना सांग, असे त्यांनी या पत्रात पत्नीला उद्देशून लिहिले आहे. स्वत:ला हुशार समजत होतो पण, चुका आणि मूर्खपणाच झाला. यामुळे कॉसमॉसच्या गैर व्यवस्थापनास मी जबाबदार आहे. यामुळे तोंड दाखवायची लाज वाटत होती. गेल्या दोन महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होतो, पण कुणालाही जिवे मारू शकत नसल्यामुळे स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.