महापौर संजय मोरे यांचे आदेश

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणातील चारही आरोपीचे नगरसेवक अपात्र ठरविण्यासंबंधी कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील सभेत त्यासंबंधी निर्णय घेण्याचे आदेश ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. या आदेशामुळे चारही नगरसेवक आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. असे असले तरी चौघा नगरसेवकांना अपात्र ठरवून महिनाभरात त्यासंबंधीचा अहवाल देण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभाग दिले होते, मात्र महापालिकेने यासंबंधी कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे नगरविकास विभाग आता यासंदर्भात कोणता निर्णय घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात हे चारही नगरसेवक जामीनावर आहेत. नगरविकास खात्याने चौघांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून, या संदर्भात ठाणे महापालिकेला नुकतेच पत्रही पाठविले होते. त्यानुसार मार्च महिन्यात चारही नगरसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या मात्र, या नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर पालिकेच्या सभागृहात दोन तृतीयांश मतांनी अपात्रतेचा ठराव मंजूर झाला तरच त्यांचे नगरसेवक पद रद्द होऊ  शकणार आहे. या चारही नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. या सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक अमित सरैय्या यांनी हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे सांगत यापूर्वी कोणावर कारवाई झाली आहे का असा सवाल उपस्थित केला.