येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश देशपांडे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा नुकताच ब्राह्मण सभा सभागृहात पार पडला. यावेळी त्यांच्या ‘मी पुणेकर मी ठाणेकर’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. सुरेश देशपांडे यांच्या विद्यार्थी दशेतील संघर्षांचे वर्णन या आत्मचरित्रातून मांडण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अनिल कढे, प्रदीप आठवले, प्रतिभा कुलकर्णी, पांडुरंग बोराडे यांच्यासह सुरेश देशपांडे यांच्या कुटुंबातील रमेश देशपांडे आणि देशपांडे कुटुंबीय उपस्थित होते.
सेवा निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सामाजिक सेवेत कार्यरत असणारे सुरेश देशपांडे हौशी पत्रकार म्हणून जागल्याची भूमिका बजावत आहेत. सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यातही त्यांनी आपल्या सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले. घरात काम करणाऱ्या सेविका, इस्त्रीवाले रामवृक्ष, वर्तमानपत्र विक्रेते सुरेश दाते आणि प्लंबर सुरेश खर्चे यांचा सत्कार देशपांडे कुटुंबीयांनी यानिमित्ताने केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षां मुतालिक यांनी केले.