कळवा रुग्णालयाचा भार कमी होणार
ठाणे शहरातील पाच ठिकाणी डायलेसीस केंद्रे उभारण्याचा निर्णय घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता वर्तकनगर, कोपरी, बाळकुम, मुंब्रा, शिवाजीनगर या भागातील पाच दवाखान्यांमध्ये आंतररुग्ण सेवा तसेच शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही सेवांसाठी आवश्यक वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी आणला आहे. या दोन्ही सेवेचा फायदा इतर आजारांच्या रुग्णांनाही होणार आहे.
महापालिकेच्या कळवा रुग्णालयात आंतररुग्ण सुविधा व शस्त्रक्रियागृहाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, महापालिकेच्या पाच दवाखान्यांमध्ये आंतररुग्ण सुविधा तसेच शस्त्रक्रियागृहांची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना शस्त्रक्रियांसाठी कळवा रुग्णालयात पाठविण्यात येते. यामध्ये होणाऱ्या विलंबामुळे काही वेळेस संबंधित महिलेला आणि तिच्या बाळाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता पाच प्रसूतिगृहांमध्ये आंतररुग्ण सेवा तसेच शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या विभागासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करावी लागणार असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या शनिवारच्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
आंतररुग्ण तसेच शस्त्रक्रिया सेवांसाठी रुग्णांना सध्या कळवा रुग्णालयात जावे लागते. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा आकडा फारच मोठा असल्यामुळे शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना काही महिने थांबावे लागते. तसेच उपचारानिमित्ताने रुग्णालयात अनेकदा खेटे घालावे लागतात. शहरातील वर्तकनगर, कोपरी, बाळकुम, मुंब्रा, शिवाजीनगर या भागातील पाच दवाखान्यांमध्ये ही सेवा करण्याचा प्रस्ताव आहे. या सेवेमुळे ठाणे महापालिका हद्दीतील रुग्णांना आता त्यांच्या जवळच्या विभागातच ही सेवा मिळणार असून नागरिकांचा खर्च तसेच वेळ वाचणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाच दवाखाने केंद्रे
*डॉ. आ. गो. जोशी रुग्णालय
*कोपरी प्रसूतिगृह व दवाखाना
*बाळकुम प्रसूतिगृह व दवाखाना
*मुंब्रा प्रसूतिगृह व दवाखाना
*शिवाजीनगर प्रसूतिगृह व दवाखाना