21 September 2020

News Flash

करोनाकाळात पौगंडावस्थेतील मुलींचे सर्वेक्षण

७ वी ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचे प्रश्नांद्वारे मनोगत जाणणार

७ वी ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचे प्रश्नांद्वारे मनोगत जाणणार

वसई : करोनाच्या संकटकाळात अनेक समस्या उद्भवल्या असून ताणतणाव आणि मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळकरी मुलींच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला आहे ते जाणून घेण्यासाठी वसईतील जाणीव संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे.

टाळेबंदी सुरू झाल्यानंतर जनजीवन ठप्प झाले. यामुळे एकापाठोपाठ एक अशा अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. यामध्ये पौगंडावस्था आणि किशोरयवयीन मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत हे जाणून त्यावर उत्तर शोधण्यासाठी जाणीव संस्थेने एक सर्वेक्षण सुरू केले आहे.

७ वी ते ११ वी शिकणाऱ्या विद्यार्थिनींना काही प्रश्न देऊन त्यांचे टाळेबंदी काळातील मनोगत जाणून घेतले जाणार आहे. त्यात ‘घरात आर्थिक अडचण निर्माण झाली आहे का?’, ‘घरात तणावाचे वातावरण आहे का?’ ‘मानसिक समस्या, नैराश्य आले आहे का?’ ‘हे शैक्षणिक वर्ष अनुकूल आहे का?’ ‘ऑनलाइन अभ्यासात लक्ष लागते का?’ यापासून ‘या काळात कुणी शारीरिक जवळीक करण्याचा, लैंगिक छळवणूक करण्याचा प्रयत्न केला का?’  असे विविध प्रश्न विचारले जाणार आहेत.

विद्यार्थिनींचे नाव गोपनीय ठेवता येणार आहे. मात्र वयोगट आणि त्या ज्या विभागात राहतात ते सांगावे लागणार आहे. महिनाभरात शहरातील १ हजार मुलींना अर्ज देऊन त्यामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

सर्वेक्षणाचा उद्देश असा

जाणीव ट्रस्ट या संस्थेचे समन्वयक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले की, संस्था प्रामुख्याने शाळकरी मुलींना विविध धोक्यांपासून वाचविण्याचे काम करते. या तणावाच्या काळात त्यांच्या  मानसिकतेवर काय परिणाम होत आहे, ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचा उपयोग समस्या सोडविण्यासाठी होणार आहे. यात व्यक्तिगत स्वरूपात मुलींना मदत होईलच शिवाय समस्यांचा कलदेखील स्पष्ट होईल असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:36 am

Web Title: survey of adolescent girls during corona period zws 70
Next Stories
1 रुग्ण करोनामुक्त होण्याच्या प्रमाणात घसरण
2 भाज्यांची आवक घटल्याने दरांमध्ये वाढ
3 भिवंडी रोड स्थानकातून माल वाहतूक, पार्सल सेवा सुरू
Just Now!
X