20 February 2019

News Flash

खारफुटी लागवडीसाठी सहा जागांची पाहणी

कांदळवनाचे जंगल फुलविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केली आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

ठाणे, डोंबिवली, भिवंडी भागातील खाडी किनाऱ्यांना प्राधान्य

मुंबई महापालिकेने ठाणे जिल्ह्य़ाच्या खाडी किनारा भागात कांदळवनाचे जंगल फुलविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या उपक्रमाला ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यातील खारफुटीला सुयोग्य अशी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई महापालिकेच्या कांदळवन लागवड विभाग आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या तिन्ही तालुक्यातील कांदळवन लागवडीसाठी योग्य असलेल्या जमिनींची पाहणी केली.

भिवंडी तालुक्यातील खाडी किनारा भागात असलेली अंजूर, अलीमगढ, कशेळी, कल्याण तालुक्यातील डोंबिवली भागातील खाडी किनारची नवागाव (नवापाडा), ठाकुर्ली खाडी किनारा आणि ठाणे तालुक्यातील मुघलपाडा (वडवली) भागातील जमीन खारफुटी लागवडीसाठी मुंबई पालिकेच्या कांदळवन विभाग आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांकडून दाखविण्यात आली आहे. कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांनी सांगितले, ‘कल्याण तालुक्यात १९ किलोमीटरचा टिटवाळा ते गंधारे, दुर्गाडी ते कोपर-भोपर असा खाडी किनारा आहे. या भागात निसर्गत: कांदळवनाची झाडे आहेत. मुंबई पालिकेला खारफुटीची लागवड करून कांदळवन फुलवायचे आहे. त्यामुळे अशा लागवडीसाठी योग्य अशी जमीन डोंबिवली पश्चिमेतील नवागाव (नवापाडा), ठाकुर्ली खाडी भागात आहे. ही जमीन मुंबई पालिकेच्या कांदळवन विभाग आणि वन अधिकाऱ्यांना दाखविण्यात आली आहे. दोन वेळा ही पाहणी पथके येऊन गेली आहेत’.

‘खारफुटी ही २४ तास पाण्याच्या भागात वाढते. भिवंडी परिसरात अशा प्रकारची जमीन अंजूर, अलीमगढ आणि कशेळी भागात आहे. ही जमीन मुंबई पालिकेच्या कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविण्यात आली आहे. जागा निश्चितीचा निर्णय मुंबई पालिका घेणार आहे’ असे भिवंडीचे तहसीलदार शशी गायकवाड यांनी सांगितले.

ठाण्याचे तहसीलदार अधिक पाटील यांनी सांगितले, ‘ठाणे खाडी परिसरात कांदळवनाचे जंगल आहे. मुंबई पालिकेला मोकळी जागा खारफुटी लागवडीसाठी हवी आहे. अशा प्रकारची लागवडीसाठी योग्य अशी जमीन मुघलपाडा (वडवली) भागात आहे.

ही जमीन मुंबई पालिकेच्या कांदळवन लागवड विभागाला दाखविण्यात आली आहे’. पाहणी केलेल्या जमिनींचे पट्टे सुमारे १० एकर ते ३० एकरचे आहेत.

महसूल विभाग तत्पर

मुंबई पालिकेने जागा निश्चित केली की तात्काळ संबंधित जमीन मुंबई पालिकेच्या कांदळवन, वन विभागाला खारफुटी लागवडीसाठी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली. पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या खारफुटीची लागवड आपल्या हद्दीत होत असल्याने जिल्हा महसूल विभागाने या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी सर्वोतपरी सहकार्य देण्याची तयारी केली आहे. पालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून आदर्शवत असा पर्यावरण संवर्धनाचा प्रकल्प उभा राहू शकतो, असा संदेश या माध्यमातून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.

First Published on February 13, 2018 1:56 am

Web Title: survey of six place in thane district for mangroves planting