डहाणू तालुक्यात शेतकऱ्यांचा वन विभागाला तीव्र विरोध

पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनला शेतकऱ्यांकडून विरोध होत असतानाही डहाणू तालुक्यातील डेहणे-पळे-कोठारी पाडा येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीत वनविभागाने झाडांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. कोठारीपाडा येथील शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला तीव्र विरोध करीत डहाणूच्या उपवनसरंक्षक आणि सामाजिक वनीकरण विभागाकडे तक्रार केली आहे.

डहाणूमधील सर्वे क्रमांक २५७, २५५, २७०, २७१, २७४, २६० आणि २५४ या जमिनीमधील शेतकऱ्यांनी या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला आहे. डहाणू तालुक्यातील चरी, डेहणे येथे पोलीस संरक्षणात दोन शेतकऱ्यांच्या जमीन मोजण्याचे काम छुप्या पद्धतीने करण्यात आले. सोमवारी डेहणे-कोठारी पाडा येथे वन विभागाकडून बुलेट ट्रेनसाठी बाधित क्षेत्रांमधील झाडांची वनविभागाकडून मोजदाद करण्याचे काम अचानक सुरू केले. यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी क्षेत्र तसेच वन पट्टय़ांमधील झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी आलेल्या वन विभागातील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला.

आदिवासी शेतकरी देवजी नवसू मोहरा, रडका गिंबल, सोनू काटेला या शेतकऱ्यांनी या विरोधामध्ये उपवनसंरक्षक डहाणू आणि सामाजिक वनीकरण या दोन्ही विभागांकडे तक्रार करून सर्वेक्षणाचे काम थांबवण्याची मागणी केली आहे.