योजनेतील शेवटचा अडसर दूर; सातबारा नावावर झाल्याने वनखात्याकडून जलवाहिन्या टाकण्यास परवानगी

हरित लवादाचा आक्षेप आणि वनखात्याच्या खोडा यावर मात करत वसई-विरार महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या ‘टप्पा ३’च्या मार्गातील अंतिम अडथळा अखेर दूर झाला. वनखात्याने शुक्रवारी वसई-विरार महापालिकेला आपल्या मार्गातून जलवाहिन्या टाकण्याच्या कामास परवानगी दिली. त्याचा कार्यादेश दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी वसई-विरारकरांना शंभर दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा मिळणार आहे.

सूर्या धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील योजनेतून वसई विरार शहराला १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. २०१४ पासून या योजनेचे काम सुरू झाले होते. नियोजित योजनेनुसार हे काम पूर्ण होऊन १ मार्च २०१५ रोजी पाणी मिळणे अपेक्षित होते. परंतु वनखात्याच्या जाचक अटींमुळे या योजनेत सातत्याने अडथळा येत होता.

या योजनेची १९ किलोमीटरची जलवाहिनी वनखात्याच्या जागेतून जाणार होती. त्याला वनखात्याने आक्षेप घेतला होता. त्यामुळे पालिकेने वनखात्याला महाडजवळील पोलादपूर येथे पर्यायी १५ एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. याशिवाय या मार्गावरील ११०० झाडे कापण्याचे पैसेही दिले होते. मात्र पोलादपूर येथील जमिनीचा सातबारा नावावर झाल्याशिवाय जलवाहिन्या टाकण्यास परवानगी देणार नाही, असा हट्ट वनखात्याने धरला होता. जवळपास ९० टक्के जमिनीचा सातबारा वनखाच्याच्या नावावर झाला होता, तरीही वनखाते परवानगी देत नव्हते. अखेर हा संपूर्ण सातबारा वनखात्याच्या नावावर झाला आणि शुक्रवारी या कामाचा कार्यादेश देण्यात आला.

शहरभर ३९१ जलवाहिन्यांचे जाळे

या कामाबरोबरच १३६ कोटींच्या अमृत योजनेअंतर्गत २३ जलकुंभ आणि ३९१ जलवाहिन्यांच्या कामासही सुरुवात झाल्याचे पालिकेने सांगितले आहे. पुढील दीड वर्षांत हे जलकुंभ बांधून पूर्ण होणार असून ३९१ जलवाहिन्यांचे जाळे शहराच्या कानाकोपऱ्यात बसवले जाणार आहे. यामुळे पुढील दीड वर्षांनंतर वसई-विरार शहराच्या प्रत्येक भागात मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचे पालिकेने सांगितले. सूर्याचे अतिरिक्त शंभर दशलक्ष लिटर पाणी पुढील दोन महिन्यांत काशिद कोपर येथील मुख्य जलकुंभात पोहोचेल. तेथून अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांतून पाणी शहराला मिळणार आहे. सध्या वसई-विरार शहराला उसगाव, पेल्हार, सूर्या आणि पापडखिंड धरणातून १३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. या योजनेच्या टप्पा-३चे काम दोन महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर शहराला अतिरिक्त शंभर दशलक्ष लिटर पाणी मिळून एकूण २३१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

योजना अशी आहे

  • सूर्या धरणाच्या तिसऱ्या टप्प्याची ही पाणीपुरवठा योजना पालिका राबवत आहे. त्यासाठी नगरोत्थानमधून ५० टक्के निधी मंजूर झालेला आहे.
  • सुमारे ३०० कोटींच्या या योजनेतून वसई-विरारमधील रहिवाशांना सूर्या धरणातून पाणी मिळणार आहे.
  • सूर्या धरणाच्या कवडास बंधारातील अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर पाणी दुक्टण येथील जलशुद्धिकरणात प्रकल्पात आणून तेथून काशिदकोपर येथील जलकुंभात आणले जाणार आहे. त्यानंतर शहरात वितरित केले जाणार आहे.