करोना बाधिताच्या संपर्कात आलेले असताना अंबरनाथ नगरपालिकेचा अक्षम्य हलगर्जीपणा

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पहिल्या करोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील दोन नातेवाईकांनाही करोनाची बाधा झाली आहे. मात्र, सुमारे दोनशे खाटांची सुविधा असलेल्या चार विलगीकरण कक्ष असूनही या दोन रुग्णांच्या संपर्कातील जवळपास ३२ जणांना त्यांच्या झोपडपट्टीसदृश दाटीवाटीच्या घरातच विलगीकरणात ठेवले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या या हलगर्जीपणावर संताप व्यक्त होत आहे.

करोनाबाधिताच्या संपर्कातील संशयितांची चौकशी करून, त्यांची तपासणी करण्याची मोहीम राज्यभरात सुरू आहे. संशयितांना विलगीकरणात ठेवावे असाही नियम आहे. मात्र अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने या नियमाला बगल दिल्याचे चित्र आहे. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात पंधरा दिवसांपूर्वी पहिला रुग्ण आढळला होता. त्याचा काही दिवसांतच मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील दोन नातेवाईकांना तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात भरती केले होते.

या रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांच्या संपर्कातील इतर जणांनाही विलगीकरणात ठेवून त्यांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील सर्वाधिक दाटीवाटीच्या आणि झोपडीसदृश घरांमध्ये राहणाऱ्या या जवळपास ३२ संशयितांना अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने अद्याप सरकारी विलगीकरण कक्षात हलवले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

अंबरनाथ नगरपालिकेने शहरात चार ठिकाणी सुमारे २०० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार केले आहे. त्यासाठी लाखो रुपयांची खरेदीही केली आहे. मात्र त्यानंतरही तब्बल ३२ संशयितांना त्यात न हलवण्याने पालिकेच्या अक्षम्य हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या ३२ संशयितांची तपासणी मंगळवारी दुपारनंतर केली जाणार होती. मात्र तोपर्यंत हे संशयित आपल्याच दाटीवाटीच्या परिसरात झोपडपट्टीसदृश घरांमध्ये राहत असल्याने इतरांनाही करोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त होते आहे. वर्दळीच्या, छोटय़ा आणि बैठय़ा घरांमध्ये हे संशयित कशाप्रकारे स्वत:ला वेगळे ठेवत असतील असा प्रश्न निर्माण होतो आहे.

त्या सर्व ३२ जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मंगळवारी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना हलवण्याबाबत निर्णय घेऊ.

– देविदास पवार, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका.