डान्स बार प्रकरण
ठाणे : शहरातील नौपाडा आणि वर्तकनगर येथील डान्स बार सुरूप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि प्रदीपकुमार सरजीने या अधिकाऱ्यांसह चार जणांचे निलंबन करण्यात आले. तर, दोन निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ठाणे शहरातील नौपाडा आणि वर्तकनगर येथील तीन डान्स बार पहाटेपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आदेश दिल्यानंतर नौपाडा आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर या भागातील साहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली.

उत्पादन शुल्क विभागाचे बजरंग पाटील आणि प्रदीपकुमार सरजीने या दुय्यम निरीक्षकांविरोधात तर, सुरेंद्र म्हस्के आणि ज्योतिबा पाटील या जवानांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच दोन निरीक्षकांविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त के. बी. उमाप यांनी दिली.

येऊर येथील दोन हॉटेल चालकांविरोधात गुन्हा

येऊर भागातील दोन बार आणि रेस्टॉरंट विरोधात ठाणे महापालिकेच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येऊर भागातील रोनाचा पाडा येथे रेडीओ लिली आणि नारळीपाडा येथे बाँबे डक नावाचे बार-रेस्टॉरंट आहे.