रस्त्यावरील खड्डय़ात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ठाणे : येथील कोरम मॉलजवळील परिसरात नाल्याच्या बांधकामासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्डय़ात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झालेल्या प्रकरणातील चौकशी अहवाल पालिकेच्या हाती आला आहे. या खड्डय़ाभोवती संरक्षक कठडे किंवा मार्गरोधक उभारण्यात न आल्यामुळेच हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असून कामात हलगर्जी केल्याबद्दल ठाणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता विजय लोकरे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सदर कामाचे कंत्राटदार अभिजित बोराळकर यांना वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. या कंत्राटदारास पालिकेनेही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठाणे येथील संभाजीनगर भागात कोरम मॉलजवळील नाल्याच्या बांधकामासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्डय़ामध्ये पडून प्रसाद देऊळकर (२६) या दुचाकीस्वाराचा मंगळवारी सकाळी मृत्यु झाला. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी एक सदस्य समिती स्थापन करत त्यांना २४ तासांत चौकशी अहवाल आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या एक सदस्य समितीने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल       (पान ४ वर)

पालिकेच्या अभियंत्याचे निलंबन; कंत्राटदारास अटक

तयार करून तो आयुक्त डॉ. शर्मा यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी सादर केला आहे. त्यामध्ये नाले बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक स्वरूपाची कोणतीही उपाययोजना संबंधित ठेकेदाराच्या कंपनीमार्फत करण्यात आलेली नसल्याची बाब पाहणीदरम्यान दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

या खड्डय़ाभोवती ठेकेदाराने संरक्षक कठडे उभारले असल्याची खातरजमा महापालिकेच्या अभियंत्यांनी करणे आवश्यक आहे. मात्र, कनिष्ठ अभियंता विजय लोकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी लोकरे यांना तात्काळ निलंबित केले आहे. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय पालिका मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. निलंबित असताना खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करण्यास परवानगी असणार नाही. तसे केल्यास गैरवर्तणुकीबद्दल दोषी ठरवून कारवाई करण्यात येईल. तसेच ते भविष्य निर्वाह भत्त्यावरील आपला हक्क गमावून बसतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

ठेकेदाराला नोटीस

कोरम मॉल परिसरात ठाणे महापालिकेकडून नाल्याचे बांधकाम सुरू आहे. या कामाचे कंत्राटदार अभिजित बोराळकर यांना वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. बुधवारी त्यांना  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी दिली. दरम्यान, या कामाच्या ठिकाणी नाले बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक स्वरुपाची कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे पाहणी दौऱ्यातून समोर येताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी मे. पायोनिअर वॉटरप्रूफ कोटिंग या कंपनीच्या ठेकेदारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामध्ये तुमचे कंत्राट रद्द करून तुम्हाला काळय़ा यादीत का टाकू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची कानउघाडणी

अपघाताच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मार्गरोधक उभारण्यात आले असल्याचा दावा करत ठाणे पालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदार आणि अभियंत्याच्या बचावाचे प्रयत्न सुरू होते. त्यावरून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अपघाताच्या ठिकाणी मार्गरोधक नसल्याचे पोलीस तपासात समोर आले तर, त्यांच्यासोबत तुम्हालाही सहआरोपी करण्यात येईल. एका व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्यांना वाचवू नका, असे खडेबोल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.